खेर्डी बाजारपेठेतील पावसाच्या साठणाऱ्या पाण्यावर मार्ग

 पंचायत समिती सदस्य भुरण यांचा पुढाकार
 व्यापाऱ्यांना विश्वासात घेवून नाले केले मोकळे
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहराचे उपनगर असलेल्या खेर्डी बाजारपेठेत पावसाचे पाणी साचू नये यासाठी पंचायत समिती सदस्य विनोद भुरण यांनी आज बाजारपेठेची पाहणी केली. व्यापारांना विश्वासात घेऊन त्यांच्या दुकानासमोरच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार करण्याची सूचना केली. व्यापाऱ्यांनी ती मान्य करून गटार काढण्याच्या कामाला सुरुवात केली.
मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला त्यावेळी खेर्डी बाजारपेठेत पावसाचे पाणी साचले होते. रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे खेर्डीत बाजारपेठेत पाणी साचले आणि व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. पाऊस थांबल्यानंतर पाण्याचा निचरा झाला परंतु व्यापाऱ्यांना फार मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. जून महिन्यात सुरुवातीचे २० दिवस कोरडे गेले. मात्र आता मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी रात्री खेर्डी परिसरात मुसळधार पाऊस झाला. बुधवारी सकाळी बाजारपेठेतील व्यापारी आपली दुकाने उघडत असताना पंचायत समिती सदस्य श्री भुरण हे आपल्या सहकार्यांना घेऊन बाजारपेठेत पोहोचले. दुकानांच्या समोर पावसाचे पाणी साचले तर व्यापाऱ्यांना आणि दुकानात येणाऱ्या ग्राहकांनाही त्याचा त्रास होईल त्यावर उपाययोजना करायचे असेल तर दुकानाच्या समोर नाला काढून पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे म्हणजे बाजारपेठेत पाणी साठणार नाही अशी सूचना श्री. भुरण यांनी व्यापाऱ्यांना केली. कोकण रेल्वेचे पुल असलेल्या ठिकाणाहून खेर्डी ग्रामपंचायतीपर्यंत दुकानदारांना प्रत्यक्ष भेटून श्री. भुरण यांनी चर्चा केली. व्यापाऱ्यांनी ती मान्य करून दुकानांसमोर चर मारायला सुरुवात केली. काही दुकानांच्या समोर नाला आहे त्यावर फरशा टाकून त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले होते. श्री. भुरण यांनी अशा व्यापाऱ्यांनाही विश्वासात घेऊन तेथील नाले मोकळे करण्यास भाग पाडले. तर काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेतले. पावसाचे चार महिने सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी व्यापाऱ्यांना केली. चौकट-
खेर्डी बाजारपेठेत पावसाचे पाणी साचते आणि व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होतो. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तात्पुरत्या उपाययोजना करताना प्रथम पाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यानंतर प्रथम व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन दुकानासमोर आणि रस्त्याच्या कडेला नाला काढण्याची सूचना केली. खेर्डीतील व्यापारी आणि स्थानिक नागरिक समजूतदार आहे. त्यांनी सूचनांचे स्वागत करून प्रत्यक्ष कृती केले त्यामुळे काही प्रमाणात का होईना पावसाच्या पाण्याचा त्रास कमी होणार आहे.
-विनोद भुरण, पंचायत समिती सदस्य खेर्डी