ग्रॅव्हीटीने पाणी आणले आपल्या दारी
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील दसपटी भागामध्ये ग्रामीण विकासाचे काम करणाऱ्या अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने जागतिक विकास कार्यक्रम (UNDP- SGP) आणि पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ही यांच्या वित्तीय सहाय्य आणि मार्गदर्शना अंतर्गत नांदिवसे ग्रामपंचायतीच्या स्वयंदेव गावातील ग्रामस्थांनी “ एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन आणि कृषी व्यवस्थापनाद्वारे जमिनीचा ऱ्हास रोखणे “ या प्रकल्पाच्या सहाय्याने पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे ठरविले. स्वयंदेव ग्रामस्थांनी अनुभव प्रतिष्ठान ट्रस्टला गावाच्या पाणी प्रश्नाबाबत माहिती देऊन तिवडी गावच्या हद्दीतून येणाऱ्या जिवंत झऱ्याची माहिती आणि प्रत्यक्ष भेट देऊन खापर झऱ्याचे पाणी ग्रॅव्हीटीने खाली गावात आणल्यास पाणी प्रश्न सुटेल अशी सूचना केली.
संस्था प्रतिनिधी, तिवडीचे शेतकरी व प्रतिनिधी आणि नांदिवसे ग्रामपंचायत प्रतिनिधी, स्वयंदेव गावचे प्रतिनिधी यांनी एकत्रित चर्चा करून या कामी अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट संस्थेस सर्व सहकार्य करण्याचे ठरविले. उपरोक्त प्रकल्पांतर्गत उपजीविका विकास, शास्वत शेती विकास प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी, जल व्यवस्थापन याविषयी कामे करण्यात येत आहेत. स्वयंदेव, राधानगर, गणेशपूर या गावातून दरवर्षी पाणीटंचाई जाणवत असते. यावर अनुभव प्रतिष्टान ट्रस्ट संस्थेच्या सहकार्य आणि मार्गदर्शनात खापर झऱ्याचे पाणी २.५ ते ३ किमी डोंगरावरून ग्रॅव्हीटीने खाली गावच्या टाकीमध्ये आणण्यास एकजुटीने सुरुवात केली. पाण्यासाठीची वणवण कमी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. फेब्रुवारीपासून पाण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत, ही समस्या अनुभव प्रतिष्ठान ट्रस्टला ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर संस्थेच्या प्रमुखांनी त्यांचे इंजिनिअर, कंत्राटदार आणि प्रकल्प टीमच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले. या कामी ग्रामस्थांचा सहभाग घेऊन डोंगरावरील झऱ्याना भेटी देऊन खापर झऱ्याचे पाणी ग्रॅव्हीटीने आणण्याचे नियोजन केले. त्यासाठी लागणारे साहित्य, वर नेणे, गावापासून झाडा झुडपातून, दाट जंगलातून रस्ता तयार करणे याचे नियोजन करून कामास सुरुवात केली. स्वयंदेव येथील प्रगतीशील शेतकरी चंद्रकांत सुर्वे यांनी पुढाकार घेऊन पूर्ण सहकार्य केले. सोबतच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी सहकार्य केले. यानुसार संस्थेच्या इंजिनिअर आणि कंत्राटदार यांनी जेसीबी आणि इतर माध्यमातून उंचसखल भागातून, झाडीमधून रस्ता तयार करण्यासाठी ग्रामस्थांचेही सहकार्य घेतले. तिवडी गावचे शेतकरी शरद पवार यांनीही त्यांच्या जमिनीतून रस्ता करून पाईपलाईनसाठी खोदाई करण्यास सहकार्य केले. त्याचबरोबर तिवडी गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी या कामी योग्य ते सहकार्य केले. रस्ता तयार करण्याचे कार्य प्रथमत: सर्व ग्रामस्थांच्या मदतीने संस्थेच्या इंजिनिअरच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले. अशा अवघड मार्गातून यंत्रांच्या सहाय्याने, ग्रामस्थांच्या सहभागाने झऱ्याच्या उद्भावापर्यंत रस्ता तयार केल्यानंतर ग्रामस्थांच्या श्रमदान आणि सहकार्यातून पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली. यानंतर २ इंच व्यासाची पाईपलाईन वरून खाली ग्राम पंचायतीच्या आधिपत्याखालील पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली. त्यापूर्वी झऱ्याच्या उद्भवाचे ठिकाणी योग्य ते बांधकाम व बांधबंदिस्ती करून ६०,००० लिटरची टाकी बांधण्यात आली. या टाकीमध्ये खापर झऱ्याचे पाणी आणून ते पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून ग्राम पंचायतीच्या मालकीच्या टाकीमध्ये आणण्यात आले. टाकी मध्ये येणारे झऱ्याचे पाणी सोबतच्या फोटोमध्ये दिसत आहे. हे पाणी पाहून त्या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ, महिला पुरुष, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे पाहून सर्वाना समाधान मिळाले.
सदर पाण्याचे पूजन ग्रामस्थांनी करून त्या ठिकाणी वनभोजन केले. अत्यंत अवघड वाटणारे कार्य ग्रामस्थ आणि अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट संस्था, आजी-माजी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागातून यशस्वी करण्यात आले. ग्रामस्थांचे उत्स्फूर्त श्रमदान, सहकार्य आणि इच्छाशक्तीमुळे हे यश मिळाले असून ग्रामस्थांनी २.५ कि.मी. डोंगर व जंगल भागातून खापर झऱ्याचे पाणी ग्रॅव्हीटीने आपल्या दारी आणण्याचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलण्याचे कार्य केले. यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून ही गरज भागवून शेतीसाठीही उर्वरित पाण्याचा उपयोग करून शेती, विविध दुबार पिके घेण्यास व कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्यसाठी करून घेता येणार आहे. ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पाण्याचे समन्यायी वाटप करून घ्यावे यासाठी ग्रामस्थांनी एका समिती उत्पादक गट तयार करून सुयोग्य व्यवस्थापन करावे अशी सूचना अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट द्वारे करण्यात आली आहे. या यशस्वी कार्याचे सर्व दूर कौतुक होत असून इतर ग्रामस्थ तेथे भेटी घेऊन माहिती घेत आहेत.













