शिरोडा किनारपट्टीवर आढळला दुर्मिळ ‘मास्कड बूबी’ समुद्री पक्षी….

वनविभागाच्या दिला ताब्यात..

वेंगुर्ले : दाजी नाईक

वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा समुद्र किनारपट्टी परिसरात दुर्मिळ समुद्री पक्षी *मास्कड बूबी* (_Sula dactylatra_) आज शुक्रवारी आढळून आल्याने पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा पक्षी स्थानिक ग्रामस्थ मिगेल कार्डोज यांना आढळून आला. पक्षी अशक्त अवस्थेत असल्याचे लक्षात येताच त्यांनी याची माहिती निसर्ग अभ्यासक व पक्षी निरीक्षक जयदीप पडवळ यांना दिली. जयदीप यांनी वनविभाग व कांदळवन विभागाला संपर्क साधला. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पक्ष्याला ताब्यात घेतले.

या पक्षाची सध्या तपासणी व आवश्यक देखभाल करण्यात येत असून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. पक्षी पूर्णपणे सुदृढ झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मास्कड बूबी हा प्रामुख्याने उष्णकटिबंधीय महासागरांमध्ये आढळणारा समुद्री पक्षी आहे. त्याचे शरीर पांढऱ्या रंगाचे असून पंखांच्या टोकांवर काळा रंग आणि डोळ्यांभोवती काळ्या रंगाचा ठळक पट्टा असल्याने त्याला ‘मास्कड बूबी’ असे नाव पडले आहे. हा पक्षी समुद्रावर उंच भरारी घेत मासे आणि इतर जलचरांची शिकार करतो. शिरोडा किनारपट्टीवर या पक्ष्याची नोंद होणे ही दुर्मिळ बाब मानली जात असून, या घटनेमुळे परिसरातील जैवविविधतेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.