श्री साई बाबांच्या भव्य पालखी मिरवणूकीने वेंगुर्लेत साई मंदिर वर्धापनदिन उत्सवास प्रारंभ..

वेंगुर्ले l दाजी नाईक :श्री साई बाबांच्या भव्य पालखी मिरवणूकीने वेंगुर्ले एस.टी. आगारातील श्री साई मंदिर देवस्थान च्या वर्धापनदिन उत्सवास प्रारंभ झाला आहे. मंदिरात सकाळी भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.

आज माघ शुद्ध प्रतिपदा शके १९४७ सकाळी ८ वा. श्री गणेश पूजन व धार्मिक विधी पार पडले. त्या नंतर वाजत गाजत साई नामाचा गजर करत मंदिरापासून साईंची भव्य पालखी मिरवणूक सुरू झाली. या पालखी मिरवणुकीने शहराला एक प्रदक्षिणा घालून ती पालखी पुन्हा मंदिरात दाखल झाली. दुपारी ३ वा. हळदीकुंकू, सायं.४ वा. स्थानिकांची भजने, सायं.५ वा. ब्राह्मण भजन मंडळ, तेर्सेबांबर्डे यांचे भजन, सायं. ७ वा. महाआरती, सायं. ७.३० वा. पालखी मिरवणूक, रात्रौ ८.३० वा. पार्सेकर द.ना. मंडळाचा ‘कर्म प्रारब्ध’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

तसेच माघ शुद्ध द्वितीया मंगळवार २० जानेवारी रोजी महारुद्र व जप सांगता, साईबाबांची महापूजा, ११ वा. महाआरती व महानैवेद्य, दु.१२ ते सायं. ४ पर्यंत महाप्रसाद, सायं. ५ वा. भजने, सायं. ७ वा. महाआरती, सायं. ७.३० वा. पालखी मिरवणूक, रात्रौ ९ वा. धनुप्रिया प्रॉडक्शन निर्मित ‘एकापेक्षा एक’ हे धमाल कौटुंबिक फार्सिकल दोन अंकी मालवणी नाटक सादर होणार आहे.

उत्सवकाळात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजाविधी व भक्तिमय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री साई मंदिर देवस्थान समिती व कर्मचारीवृंद, रा. प. वेंगुर्ला आगार यांनी केले आहे.