डिपफ्रिजर आणि दुचाकीसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी: प्रतिनिधी
गेल्या रविवारी फणसवळे येथे गोमांसाचे अवशेष सापडल्यानंतर आणि हिंदू कार्यकर्ते यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गोवंश तस्करीचे बिमोड करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लांजेकर नगर, उद्यमनगर येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकून तब्बल ५१ किलोपेक्षा जास्त गोमांसासह एका आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत एका दुचाकीसह सुमारे १ लाख ६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी लियाकत शौकत दावत (वय ४८, रा. लांजेकर नगर, उद्यमनगर, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस अहवालानुसार, २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:५५ वाजण्याच्या सुमारास लांजेकर नगर येथे आरोपी लियाकत दावत हा विनापरवाना गोवंश प्राण्यांच्या मांसाची वाहतूक करत असल्याची आणि स्वतःच्या फायद्यासाठी ते विक्रीकरिता बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार गणेश राजेंद्र सावंत (वय ३९) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
डिपफ्रिजर आणि दुचाकीसह मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
गोमांस: ३२० रुपये प्रति किलो दराने एकूण ५१ किलो ५०० ग्रॅम गोमांस (दोन वेगवेगळ्या भागांत ७ किलो आणि ४४ किलो ५०० ग्रॅम) ज्याची एकूण किंमत १६,४८० रुपये आहे.
दुचाकी वाहन: गोमांस वाहतुकीसाठी वापरलेली होन्डा कंपनीची ग्रे रंगाची ॲक्टिव्हा दुचाकी (क्र. MH 08 AZ 6485), किंमत 70000रुपये.
डिपफ्रिजर: मांस साठवण्यासाठी वापरण्यात आलेला टाटा व्होल्टास कंपनीचा पांढऱ्या रंगाचा डिपफ्रिजर, किंमत 20,000 रुपये.
आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३२५, तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५ चे कलम ५ (ब), ५ (क), ९ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम ६६(१), १९२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गेल्या रविवारीच फणसवळे येथे गोमांसाचे अवशेष सापडले होते, आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उद्यमनगर भागात हा मोठा साठा जप्त झाल्याने रत्नागिरीत गोवंश हत्या करणाऱ्यांचे रॅकेट सक्रिय असल्याचे चित्र समोर येत असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













