रत्नागिरीत १ लाख २१ हजारांच्या ब्राऊन हेरॉईनसह दोन नेपाळी तरुणांना अटक

रत्‍नागिरी प्रतिनिधी
शहरातील आठवडा बाजार येथील पाण्याच्या टाकीजवळ रस्त्‍यावर तब्बल 1 लाख 21 हजारांच्या ब्राउन हेरॉईन या अमली पदार्थासह दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवार 18 सप्टेंबर रोजी रात्री 10.40 वा.सुमारास करण्यात आली.

शिवकुमार चौधरी उर्फ शिव बहाद्दूर सोनार (32,मुळ रा.नेपाळ सध्या रा.मुरुगवाडा,रत्‍नागिरी) आणि दुर्गा जित बहाद्दूर (31,मुळ रा.नेपाळ सध्या रा.मुरुगवाडा,रत्‍नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्‍यांच्या विरोधात पोलिस कर्मचारी अमित कदम यांनी तक्रार दिली आहे. त्‍यानुसार,शुक्रवारी रात्री शहर पोलिस रत्‍नागिरी शहरात गस्त करत असताना त्‍यांना आठवडा बाजार येथील पाण्याच्या टाकीजवळ दोन्ही संशयित संशयास्पदरित्‍या फिरताना दिसून आले. पोलिसांनी त्‍यांची चौकशी व झडती घेतल्यावर त्‍यांच्याकडून 1 लाख 21 हजारांचा ब्राउन हेरॉईन हा अमली पदार्थ व 15 हजारांचा मोबाईल असा एकूण 1लाख 36 हजारांची मुद्देमाल मिळून आला. संशयितांविरोधात एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8 (क),21(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.