गुन्हा दाखल : मेढा, कुंभारमाठ परिसरात कारवाई
मालवण | प्रतिनिधी : अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांविरोधात मालवण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कुंभारमाठ आणि मेढा परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी दोन संशयितांना गांजा सदृश्य अमली पदार्थसह रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करून पुढील कारवाई सुरू होती.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. यात राजन गणेश चव्हाण (वय २६, रा. वायरी भरड) या संशयिताला गांजासह ताब्यात घेण्यात आले. मेढा परिसरात केलेल्या दुसऱ्या कारवाईत विल्सन सेबेस्टीयन फर्नांडिस (वय २५, रा. कुंभारमाठ) याला गांजा बाळगल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले.
पकडण्यात आलेल्या दोन्ही संशयितांवर अंमली पदार्थ विरोधी कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरु होती.
संशइतांकडे गांजा कुठून आला आणि ते तो कोणाला विकणार होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
पोलीस निरीक्षक मारुती जगताप आणि पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.












