बेकायदा विद्यार्थी वाहतुकीविरोधात नागरिक आक्रमक

 नियमबाह्य वाहनांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी
 चिपळूण पोलिसांना निवेदन

चिपळूण (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांच्या बेकायदा वाहतुकीविरोधात चिपळुणातील काही सामाजिक कार्यकत्यांनी चिपळूण पोलिसांना निवेदन दिले व याबाबत कायद्यानुसार उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली. या निवेदनानुसार आता शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र बार चिपळूण परिसरात शालेय विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी नियमांचे पालन होत नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होवू शकतो. त्यामुळे पोलिसांनी अशा वाहनांवर लक्ष ठेवावे व नियमबाह्य वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
अनेक ठिकाणी जुन्या ओम्नी मारूती गाड्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. एलपीजी सिलिंडर लावून अनेक गाड्या विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. याकडेही पोलिसांनी लक्ष द्यावे. मध्यंतरी महाराष्ट्र हायस्कूल रस्त्यावर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एका ओम्नी गाडीचा अपघात झाला होता. ही घटना लक्षात घेऊन पोलिसांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी रिक्षामध्ये १२ ते १५ विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक करण्यात येते. मुंबई-गोवा महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने जात असतात. अनेक ठिकाणी सव्र्व्हस रोडच्या अनियोजनामुळे धोकादायक वाहतूक सुरू असते. गुहागर बायपास, पॉवर हाऊस ही ठिक्राणे धोकादायक झाली आहेत. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांना विद्यार्थ्यांची वाहतूक करताना विद्यार्थी संख्या नियंत्रित ठेवण्याबाबत पोलिसांनी त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करावे व नियमांचे पालन कसे होईल याकडे काटेकोर लक्ष देणे गरजेचे आहे. चिपळूण शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे अशाप्रकारे वाहतूक होत असेल तर संबंधितांवर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याच पद्धतीने अनेक स्कूल बसमध्ये शासनाच्या परिवहन खात्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही याचा आढावा घेणे गरजेचे आहे. अनेक स्कूल बसमध्ये मोठ्याने डीजे लावून विद्यार्थी वाहतूक सुरू असते. या बसेसवर पोलिसांनी कारवाई करावी. त्याचपद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पोलिसांच्या आदेशाने सव्र्व्हस रोडचाच वापर करावा याची सक्ती करावी. कारण ही वाहने प्रत्येक ठिकाणी थांबत असतात. ही वाहने जागोजागी थांबली तर मोठा अपघात घडण्याचा धोका आहे. याबाबत पोलिसांनी दखल घ्यावी व अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू काणे, स्वाती भोजने, रविना गुजर, स्नेहल चव्हाण, तृप्ती कदम, वीणा जावकर, पुनम भोजने, निशिगंधा बांदेकर, राधिका तटकरे आदी उपस्थित होत्या.