खेड | प्रतिनिधी :
पत्रकारांना कथित शिवीगाळ करून धमकावल्याच्या प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खेड तालुक्यातील समस्त पत्रकारांनी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत खेड पोलीस प्रशासनाला सादर करण्यात आली असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजासमोर सत्य परिस्थिती मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते पार पाडत असतात. अशा परिस्थितीत पत्रकारांना धमकावणे, शिवीगाळ करणे किंवा अपमानास्पद भाषा वापरणे हा केवळ पत्रकारांवरील हल्ला नसून भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही आघात आहे. अशा घटनांमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन स्वतंत्र व निर्भीड पत्रकारितेला बाधा पोहोचू शकते, अशी चिंता पत्रकारांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी देण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन त्वरित योग्य ती कारवाई न केल्यास राज्यभरातील पत्रकार संघटनांच्या समन्वयाने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही खेड तालुक्यातील पत्रकारांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे पत्रकारांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.













