असनिये हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून मातृसंस्थेला ४६,५०० रूपयांची देणगी

सरपंच सौ. साधना गवस यांचा शाळेतर्फे सत्कार

​सावंतवाडी :
आपल्या मातृसंस्थेबद्दलची आत्मीयता आणि ऋणानुबंध जपत शाळेच्या सन २०१२, २०१३ व २०१४ च्या माजी विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेच्या विकासासाठी ४६,५०० रूपयांची देणगी सुपूर्द केली.

​यावेळी सन २०१२ च्या बॅचचे माजी विद्यार्थी कुमार विनायक नाईक तसेच सन २०१३ च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी सौ. साधना गवस यांनी आपापल्या बॅचचे प्रतिनिधित्व करत शाळेत उपस्थिती दर्शविली होती. सौ. साधना गवस या शेटवे गावच्या सरपंच असल्याने शाळेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

​मुख्याध्यापिका श्रीमती सावंत मॅडम यांनी आपल्या मनोगतात माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी जपलेली कृतज्ञता, आपुलकी आणि विकासासाठी दिलेले योगदान याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. ही देणगी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत पारदर्शकपणे व विधायक कामांसाठी वापरण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
​या कार्यक्रमाचे आभार शालेय मुख्यमंत्री कु. वेदांगी कोळपाटे हिने मानले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या मोलाच्या योगदानामुळे इतर माजी विद्यार्थ्यांनाही आपल्या मातृसंस्थेच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.