रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार दिनांक ०१ ते ०५ जुलै २०२६ दरम्यान जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. या कालावधीत कमाल तापमान २७ ते ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज असून आकाश पूर्णतः ढगाळ राहील. विशेषतः ३० जून आणि ०१ जुलै रोजी तुरळक ठिकाणी, तर ०२ ते ०४ जुलै दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा थेट इशारा देण्यात आला आहे. तसेच, विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात ०५ ते ११ जुलै दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. हवामान वेधशाळेच्या नोंदीनुसार, मागील आठवड्यात (२३ ते २९ जून) जिल्ह्यात ३६१.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, १ जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत एकूण ५३१.३ मिमी पाऊस झाला आहे.
या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण कृषि मौसम सेवेचे नोडल अधिकारी डॉ. वैभव राजेमहाडीक आणि तांत्रिक अधिकारी डॉ. यशपाल चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी पिकांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा कृषी सल्ला जारी केला आहे. ज्या भागात चिखलणीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे, तेथे २१ ते २७ दिवसांची (१२ ते १५ सें.मी. उंचीची व ५ ते ६ पाने आलेली) रोपे वापरून भाताची पुनर्लागवड सुरू करावी. लावणी करताना १५x१५ सें.मी. किंवा २०x१५ सें.मी. अंतरावर उथळ (२.५ ते ३.५ सें.मी. खोल) लावणी करावी, ज्यामुळे फुटवे चांगले येतात. मात्र, अतिवृष्टीचा अंदाज पाहता भात रोपवाटिकेला युरिया खताचा दुसरा हप्ता देण्याचे काम पुढील सल्ला येईपर्यंत पुढे ढकलावे. तसेच भात, नागली, वरी रोपवाटिकांसह भुईमूग आणि कारळा पिकाच्या शेतात अतिरिक्त पाणी साचू नये म्हणून पाण्याचा निचरा करण्याची चोख व्यवस्था करावी. मुसळधार पावसामुळे भुईमूग, कारळा आणि वेलवर्गीय भाजीपाल्याची नवीन पेरणी तूर्तास पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले असून, ज्यांची पेरणी झाली आहे त्यांनी शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता आंबा आणि नारळ बागेत सध्या खते देण्याचे काम थांबवावे. यासोबतच आंबा, काजू, सुपारी आणि नारळाच्या नवीन कलमांची किंवा रोपांची लागवड करण्याचे कामही पुढील कृषी सल्ला प्रसिद्ध होईपर्यंत पुढे ढकलण्यात यावे.
पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालनाबाबतही विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांना उघड्यावर किंवा झाडांखाली न बांधता सुरक्षित गोठ्यात अथवा शेडमध्ये ठेवावे. कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांनी शेडच्या खिडक्या व्यवस्थित झाकून घ्याव्यात, जेणेकरून पक्ष्यांचे पाऊस आणि तीव्र वाऱ्यापासून संरक्षण होईल.
हवामान आणि विजेच्या इशाऱ्यांची अचूक माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘मेघदूत’ आणि ‘दामिनी’ मोबाईल ॲपचा वापर करावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विज्ञान केंद्राशी किंवा महाराष्ट्र शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. अशोककुमार चव्हाण यांनी केले आहे.













