देवगडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; जामसंडे व वाडा येथे घरांचे नुकसान, महिला जखमी

देवगड : देवगड तालुक्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दिवसभरात काल 112 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यात विविध ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून एका महिलेला दुखापत झाली आहे.

जामसंडे पाटकरवाडी येथे श्री. सखाराम कावले यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळली. यावेळी त्यांच्या पत्नी सुनंदा कावले या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालय, देवगड येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेत घराच्या पडवीसह घराचेही नुकसान झाले असून संबंधित नुकसानीचा सविस्तर पंचनामा लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी, जामसंडे यांनी दिली.

दरम्यान, मौजे वाडा येथेही अतिवृष्टीमुळे अरुणा नरहर आचरेकर यांच्या घराचे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नुकसानीची पंचयादी लवकरात लवकर सादर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, सखल भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.