भजनाचा नाद यंदा जलसंधारणासाठी; सातेरी देवीच्या चरणी पाणीबचतीचा संकल्प!

सातेरी कला प्रेमी मंचाचा स्तुत्य उपक्रम

तीन ठिकाणी बंधाऱ्यांची कामे, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचे श्रमदान

स्वप्निल कदम (कुडाळ) :
नवरात्रोत्सवात भजन स्पर्धेच्या माध्यमातून भक्तीचा जागर करणाऱ्या तालुक्यातील कवठी येथील सातेरी कला प्रेमी मंचाने यंदा सामाजिक बांधिलकी जपत जलसंधारणाचा संकल्प केला आहे. संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन यंदा भजन स्पर्धेऐवजी गावातील पाणीसाठा वाढविण्यासाठी तीन ठिकाणी बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली. ग्रामपंचायत कवठीच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘पाणी वाचवा, भविष्य घडवा’ हा संदेश देण्यात आला आहे.

यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पावसाचे पाणी अडविणे, पाणीसाठा वाढविणे आणि भूजल पातळी टिकवून ठेवणे, या उद्देशाने सातेरी कला प्रेमी मंचाने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले. धार्मिक परंपरेसोबतच गावाच्या पाणीप्रश्नासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय मंचाने घेतला.

या उपक्रमांतर्गत सातेरी महादेव मंदिराच्या पाठीमागील बंधारा माती टाकून मजबूत करण्यात आला. सार्वजनिक विहिरीजवळ वनराई बंधारा उभारण्यात आला, तर श्री. गोपाळ कवठकर यांच्या घराजवळील बंधाऱ्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आले. या कामांमुळे पावसाचे पाणी अडवून पाणीसाठा वाढविण्यास मदत होणार आहे. मंचाचे सदस्य आणि ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदान केले.

नवरात्रोत्सवात भजन स्पर्धा आयोजित करण्याची परंपरा जपणाऱ्या मंचाने यंदा काळाची गरज ओळखून जलसंधारणाला प्राधान्य दिले. सातेरी देवीच्या चरणी भक्ती अर्पण करण्याबरोबरच गावाच्या भविष्यासाठी पाणी वाचविण्याचे कार्य करणे, हीच खरी सेवा असल्याची भावना या उपक्रमातून व्यक्त झाली. धार्मिक उत्सवाला सामाजिक कार्याची जोड देणाऱ्या मंचाच्या या निर्णयाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

या उपक्रमासाठी मुंबई येथील कवठी युवक मंडळाचे सदस्य संजय चिचकर यांनी एक हजार रुपये, तर अरुण खडपकर यांनी एक हजार रुपये आर्थिक सहकार्य केले. कामाच्या ठिकाणी सहभागींसाठी अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती. श्रमदान करणारे सदस्य, ग्रामस्थ आणि आर्थिक मदत करणाऱ्या दात्यांचे मंचाच्या वतीने आभार मानण्यात आले.
गावातील पाणीसाठा वाढविण्यासाठी आणखी काही ठिकाणी बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामस्थांनी योग्य ठिकाणे सुचवावीत, नवीन कल्पना मांडाव्यात आणि आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन मंचाने केले आहे. तसेच प्रत्येकाने दैनंदिन जीवनात पाण्याचा जपून वापर करून पाणीबचतीला प्राधान्य द्यावे, असेही सांगण्यात आले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अथवा आर्थिक मदत देण्यासाठी ९४२१२६१०१७ / ९४२१२६११६० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.भजनातून भक्ती आणि कृतीतून समाजसेवा, हा विचार प्रत्यक्षात उतरवत सातेरी कला प्रेमी मंचाने नवरात्रोत्सवाला जलसंधारणाची जोड दिली आहे. गावाच्या पाणीप्रश्नासाठी एकत्र येण्याचा हा उपक्रम भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.