​वडाचापाट ग्रामपंचायतीतर्फे ‘कृषी दिन’ उत्साहात साजरा; शेतकऱ्यांना शेतीपूरक औजारांचे वाटप

​मसुरे | झुंजार पेडणेकर
हरितक्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून, ग्रामपंचायत कार्यालय वडाचापाट येथे ‘कृषी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शेतकऱ्यांना शेतीपूरक औजारांचे (खोरे) मोफत वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या तोंडावर मिळालेल्या या मदतीमुळे शेतकरी बांधवांकडून समाधान व्यक्त होत आहे.

​कार्यक्रमाची सुरुवात कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ​श्री. राजेंद्र प्रभुदेसाई (माजी पंचायत समिती सभापती),
​सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई (सरपंच, वडाचापाट),
​श्री. सचिन महादेव पाताडे (उपसरपंच),
ग्रा सदस्य ​श्री. विनायक प्रभुदेसाई,
ग्रामपंचायत अधिकारी ​श्री. लक्ष्मण सरमळकर,
उद्योजक ​श्री. दयानंद प्रभुदेसाई, ​ श्रीकांत पाटकर, ​सौ. पुर्वा पाटकर
​यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, स्थानिक शेतकरी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

​शेतकऱ्यांचा सन्मान आणि मार्गदर्शन
​या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा आणि त्यांनी महाराष्ट्राला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्यासाठी घेतलेल्या कष्टांचा गौरव केला. वडाचापाट ग्रामपंचायत नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून, त्यांना शेतीकामात मदत व्हावी या हेतूनेच या उपयुक्त औजारांचे (खोरे) वाटप करण्यात आल्याचे माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले. आभार ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर यानी मानले.