सावंतवाडीत नगरपरिषदेची प्लास्टिक विरोधी धडक मोहीम;

आठवडा बाजारातून प्लास्टिक जप्त, दंडात्मक कारवाई

​सावंतवाडी:
महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत मंगळवार, दिनांक ३० जून रोजी शहरातील आठवडा बाजार परिसरात विशेष तपासणी व कारवाई मोहीम राबविण्यात आली. या धडक मोहिमेमुळे नियमबाह्य प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
​या मोहिमेदरम्यान सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने आठवडा बाजारातील विविध विक्रेते, भाजी व्यावसायिक आणि इतर दुकानदारांची कसून तपासणी केली. यामध्ये शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या, सिंगल युज प्लास्टिक साहित्य तसेच इतर नियमबाह्य प्लास्टिक वस्तूंचा वापर करणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला. संबंधित विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांच्याकडून नियमानुसार दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली आहे.
​सावंतवाडी शहर व परिसरात प्लास्टिकचा वाढता वापर रोखून पर्यावरण संवर्धनास चालना देणे, तसेच शहर स्वच्छ व प्रदूषणमुक्त करणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.
​नागरिकांना कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन
प्लास्टिकला पर्याय म्हणून सर्व व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात कापडी पिशव्या, कागदी पिशव्या व इतर पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.
​यापुढे कारवाई अधिक कठोर होणार!
आगामी काळात सावंतवाडी शहर परिसरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक कठोरपणे केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करून प्लास्टिकचा वापर किंवा साठा करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही नियमितपणे तपासणी मोहीम राबवून मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत देण्यात आला आहे.