केळुस येथील वेंगुर्ले तालुकास्तरीय “कृषिदिन व शेतकरी मेळाव्याला प्रतिसाद
वेंगुर्ले : दाजी नाईक
भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती घडविल्याने आज कृषी क्षेत्रात मोठे बदल दिसून येत आहेत. यापुढेही शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये प्रगती साधताना नैसर्गिक शेतीकडे वळावे तसेच शेती बरोबरच पशुधन टिकविण्यासाठी सर्वकष प्रयत्नाची गरज आहे, असे प्रतिपादन वेंगुर्ला पंचायत समिती चे सभापती शंकर घारे यांनी केळुस येथे बोलताना व्यक्त केले.
वेंगुर्ला पंचायत समिती वेंगुर्ला कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत केळूस यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त आज बुधवारी स. का. पाटील विद्यामंदीर, केळूस येथील गुरुवर्य गोविंद मधुसूदन दाभोलकर सभागृहात तालुकास्तरीय “कृषिदिन व शेतकरी मेळावा
वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, संजय गावडे, सुजाता पडवळ, विजय नाईक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, पं.स. कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, पंचायत समिती सदस्य विष्णु फणसेकर, नितीन मांजरेकर, शीतल राऊत, साक्षी नार्वेकर, केळूस सरपंच योगेश शेट्ये, उपसरपंच संजीव प्रभू, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. रणजीत देव्हारे, धनंजय गोळम, ग्रामपंचायत अधिकारी विवेक वजराटकर, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.
कै. वसंतराव नाईक यांनी घडविलेल्या शेतीतील क्रांतीमुळे आज चांगले फलित : प्रितेश राऊळ
या वेंगुर्ले तालुकास्तरीय कृषी दिन कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ म्हणाले की, केळुस गावाने कृषी दिनाचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या राबविला आहे. भारतामध्ये कै. वसंतराव नाईक यांनी घडविलेल्या शेतीतील क्रांतीमुळे आज चांगले फलित मिळत आहे. असे सांगून शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊ शेतीमध्ये प्रगती साधावी असेही त्यांनी सांगितले.
या कृषी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कृषी दिनानिमित्त वृक्षदिंडी काढण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांद्वारे ईश्वस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी कृषिविषयक मार्गदर्शन केले. यावेळी या कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तारादेवी महिला गटाने शेतकरी नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी स.का. पाटील विद्यामंदिर केळुस, नवभारत विद्यालय केळुस व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कालवी आदी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी, विविध रानभाज्या प्रदर्शन व विक्री यामध्ये सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सूत्रसंचालन व आभार प्रशांत चव्हाण यांनी मानले.













