जिद्द चिकाटी व पतीच्या सहकार्यामुळे शक्य
चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहरातील रोशनी महेश विंचू यांनी घर आणि संसार सांभाळत वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. जिद्द, मेहनत आणि पतीच्या भक्कम साथीने हे सारे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले व एलएलबी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे सारे श्रेय ते आपल्या पतीला देतात.
रोशनी विंचू यांचे मूळ गाव पोलादपूर असून त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. त्यानंतर १० वर्षे त्यांनी निबंधक (रजिस्ट्रार) कार्यालयाचे खाजगी कामे करायला सुरुवात केली. त्यामुळे कायद्याच्या अभ्यासाचा त्यांना अनुभव होता. लग्नानंतर पुन्हा चिपळूण येथे एक वर्षभर घरातून रजिस्ट्रार ऑफिसची कामाला सुरुवात केली. मात्र तेथे अपेक्षेप्रमाणे काम मिळत नसल्याने चिपळूण शहरात स्वतःचे कार्यालय सुरू केले. गेली सात वर्षे त्यांनी रजिस्ट्रार ऑफिसची कामे करता करता वकिलीची परीक्षा दिली. यात पती महेश विंचू यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे वकिलीच्या स्वप्नाला नवी दिशा मिळाली. लहान मुलगी, घराची जबाबदारी, कार्यालयाचे काम आणि अभ्यास या सर्वांचा समतोल साधत त्यांनी अथक परिश्रम घेतले. अनेक अडचणींचा सामना करत अखेर वकील होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून ॲडव्होकेट म्हणून उभी आहे, त्यामागे पती महेश विंचू यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी प्रत्येक कठीण प्रसंगी आपल्यावर विश्वास ठेवला, तसेच सतत प्रेरणा दिली आणि खंबीरपणे साथ दिली. पती महेश विंचू यांच्या सहकार्यामुळेच लग्नानंतर संसार सांभाळत शिक्षण पूर्ण करून ॲडव्होकेट होण्याचा मान मिळाला. संसार ते वकिलीचा प्रवास प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी ठरो, जिद्द चिकाटी व मेहनत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जाते आहे.













