सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रक्रिया पूर्ण
मालवण:जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने देवबाग (ता. मालवण) येथील श्रीम. मनीषा मधुसूदन तांडेल यांचे मरणोत्तर देहदान आज, दि. ३ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे करण्यात आले.
श्रीम. मनीषा तांडेल यांच्या निधनानंतर त्यांच्या समाजोपयोगी इच्छेचा आदर करत तांडेल कुटुंबियांनी हे पाऊल उचलले. देहदान प्रक्रियेच्या वेळी मृत मनीषा तांडेल यांचे पती श्री. मधुसूदन भिसाजी तांडेल, दीर श्री. रमाकांत भिसाजी तांडेल आणि इतर सर्व कुटुंबिय उपस्थित होते. दुःखाच्या प्रसंगातही तांडेल कुटुंबियांनी दाखवलेल्या या सामाजिक दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समाजप्रबोधनातून आणि प्रेरणेतून आजपर्यंत एकूण २१९ मरणोत्तर देहदाने आणि १८२ अवयव दाने यशस्वीपणे पार पडली आहेत. याच मानवतेच्या साखळीत आज आणखी एका देहदानाची नोंद झाली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही देहदान प्रक्रिया पार पडली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. दवंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शरीरशास्त्र विभाग प्रमुख प्राजक्ता थेटे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब जोशी, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. कौस्तुभ देशपांडे, नेत्रदान समुपदेशक सिद्धार्थ कांबळे आणि कर्मचारी गोसावी आदी संबंधित अधिकारी व वैद्यकीय चमू उपस्थित होते. त्यांनी तांडेल कुटुंबियांच्या या निर्णयाचे आभार मानले.
याप्रसंगी रामानंद संप्रदाय सिंधुदुर्गचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.












