वृक्षारोपण कार्यक्रमासह प्रलंबित मागण्यांवर होणार चर्चा
रत्नागिरी : प्रतिनिधी
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार रत्नागिरी बार असोसिएशनच्या वतीने शनिवारी (४ जुलै) दुपारी २ वाजता जिल्हा न्यायालयातील रूम क्रमांक २०६ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात वकिलांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून त्या शासन व बार कौन्सिल स्तरावर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड विलास पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष ॲड. निनाद शिंदे, ॲड. शाल्मली आंबुलकर, कोषाध्यक्ष ॲड. अवधूत कळंबटे आणि सहसचिव ॲड. राहुल चाचेही उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना पाटणे म्हणाले कि, सर्वोच्च न्यायालयाने सुचविलेल्या तरुण वकील सहाय्य निधीची अंमलबजावणी, वकील संरक्षण कायदा तातडीने मंजूर करणे, वकिलांविरोधातील तक्रारींचा जलद निपटारा, दक्षता समित्यांची स्थापना, वेल्फेअर फंड योजना अधिक सुलभ करणे, वकिलांसाठी चेंबरची जागा उपलब्ध करून देणे तसेच न्यायमूर्ती अमानुल्ला यांच्या सूचनेनुसार निवारण समित्या स्थापन करणे आदी मागण्या यावेळी नवनिर्वाचित सदस्यांसमोर मांडण्यात येणार आहेत.
या सत्कार सोहळ्यास ॲड पारिजात पांडे, ॲड. उदय वारुंजीकर, ॲड. विठ्ठल कोंडेदेशमुख, ॲड. विवेक घाटगे, ॲड. अहमदखान पठाण, ॲड. रंजना भोसले आणि ॲड. माधवी पोतदार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सत्कार सोहळ्यापूर्वी दुपारी १.३० वाजता जिल्हा न्यायालय ते जयस्तंभ परिसरात प्रधान जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला असल्याचे पाटणे यांनी सांगितले.













