तब्बल १४ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत ; आराध्य आपटे जिल्ह्यात प्रथम तर राज्यात नववा
सावंतवाडी । प्रतिनिधी :गुणवत्तेची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या येथील कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर (सावंतवाडी शाळा नं. २) या शाळेने चालू वर्षाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत या एकाच शाळेतील तब्बल १४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत मानाचे स्थान पटकावले आहे. एकाच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून एकाच वर्षात १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनण्याची ही ऐतिहासिक घटना असून, या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामत विद्यामंदिर शाळेचा डंका वाजला आहे.
या परीक्षेत शाळेचा विद्यार्थी आराध्य अमोल आपटे याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला असून, त्याने राज्य पातळीवरील गुणवत्ता यादीतही नववा क्रमांक प्राप्त केला आहे.
गुणवत्ता यादीतील यशस्वी मानकरी आणि त्यांचे जिल्हा पातळीवरील क्रमांक:
शाळेतील एकूण १४ विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवरील गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांचे यश पुढीलप्रमाणे आहे:
आराध्य अमोल आपटे (जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात ९ वा), पूर्वांग कुणाल माळगावकर (जिल्ह्यात ५ वा), सई शिवाजी आरेकर (जिल्ह्यात ७ वी), सुरेश मंगेश वरक (जिल्ह्यात ८ वा), नील पांडुरंग थोरात (जिल्ह्यात १४ वा), श्रीशा मिहिर प्रभुदेसाई (जिल्ह्यात १६ वी), स्वामिनी अजित कोळी (जिल्ह्यात १९ वी), साहिल शाहू खरात (जिल्ह्यात २० वा), दुर्वा अजित सावंत (जिल्ह्यात २५ वी), श्रीकर मंदार शुक्ल (जिल्ह्यात २७ वा), मैत्रेय राजाराम दळवी (जिल्ह्यात ३६ वा), मीरा मकरंद देसाई (जिल्ह्यात ३९ वी), नील प्रशांत नार्वेकर (जिल्ह्यात ४२ वा) आणि सानवी चेतन देसाई (जिल्ह्यात ५३ वी).
यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव
एकाच प्राथमिक शाळेतून इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जिल्हा व राज्य पातळीवरील गुणवत्ता यादीत झळकल्याने सावंतवाडी शहरासह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रातून या विद्यार्थ्यांचे जोरदार कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशात त्यांनी घेतलेले कड़ेकोट परिश्रम, शाळेतील शिक्षक रणजित सावंत, पूजा ठाकूर, प्राची ढवळ, भावना गावडे, हेमांगी जाधव आणि तेजस बांदिवडेकर यांचे लाभलेले योग्य मार्गदर्शन तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य कारणीभूत ठरले आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अजित सावंत, उपाध्यक्षा श्रीम. मीना दाभोलकर, श्री. नंदू गावडे, सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व पालक, सावंतवाडी शहरातील शिक्षणप्रेमी, केंद्रप्रमुख श्री. कमलाकर ठाकूर, गटशिक्षणाधिकारी श्री. शेर्लेकर साहेब, तसेच अखिल संघटना राज्य उपाध्यक्ष श्री. महादेव देसाई यांनी भरभरून कौतुक केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.













