धोकादायक रस्त्याची ग्रामपंचायत सदस्याकडून साफसफाई

वेत्ये गावातील राजेंद्र आंबेकर यांच्या तत्परतेमुळे संभाव्य अपघात टळले

सावंतवाडी । प्रतिनिधी :वेत्ये गावातील श्री कलेश्वर मंदिर ते वरची गावकरवाडी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील धोकादायक माती अखेर ग्रामपंचायत सदस्य श्री. राजेंद्र रामचंद्र आंबेकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन साफ केली आहे. त्यांच्या या तत्परतेमुळे या मार्गावरील संभाव्य अपघात टळले असून ग्रामस्थांनी आणि वाहनचालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

वेत्ये कलेश्वर मंदिर ते वरची गावकरवाडी या रस्त्यालगत असलेल्या एका खाजगी जमिनीत नुकतेच खोदकाम करण्यात आले होते. मात्र, संबंधित जमीन मालकाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या खोदकामातील मोठ्या प्रमाणावर माती वाहून थेट रस्त्यावरील कॉजवेवर (पाटावर) आली होती. सततच्या पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय होऊन कमालीचा घसरगुंडीचा बनला होता.

या मुख्य रस्त्यावरून दररोज मोठ्या संख्येने दुचाकीस्वार, पादचारी आणि शाळकरी मुले प्रवास करतात. रस्त्यावरील या मातीमुळे व घसरणीमुळे येथे केव्हाही मोठा अपघात होऊन जीवित किंवा वित्तहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. या गंभीर समस्येची दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आंबेकर यांनी सुरुवातीला संबंधित जमीन मालकाला रस्त्यावरील माती तात्काळ साफ करण्याबाबत पूर्वकल्पना दिली होती. मात्र, तिथून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

पावसाचा वाढता जोर आणि रस्त्याची दुरवस्था पाहता, कोणत्याही निष्पाप ग्रामस्थाला किंवा शाळकरी मुलाला इजा होऊ नये, यासाठी श्री. राजेंद्र आंबेकर यांनी स्वतः पुढाकार घेण्याचे ठरवले. त्यांनी स्वतः प्रत्यक्ष जागेवर उभे राहून मजुरांच्या साहाय्याने रस्त्यावरील सर्व माती साफ करून घेतली. त्यामुळे हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित झाला आहे. यासोबतच त्यांनी कॉजवेवरील पाण्याचा तुंबलेला प्रवाह देखील व्यवस्थित सुरळीत करून दिला.

ऐन पावसाळ्यात दाखवलेल्या या कर्तव्यतत्परतेबद्दल ग्रामपंचायत सदस्य श्री. राजेंद्र रामचंद्र आंबेकर यांचे वेत्ये गावातील सर्व ग्रामस्थ, पादचारी आणि वाहनचालकांकडून विशेष कौतुक व आभार मानले जात आहेत.