विभागीय आयुक्तांकडून भालावल ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक

ई-ऑफिस आणि एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सावंतवाडी तालुक्यातील भालावल ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला. दैनंदिन प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि ई-ऑफिस प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करून भालावलने ग्रामीण प्रशासनात डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा दाखवली आहे, अशा शब्दांत विभागीय आयुक्तांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले.

भालावल ग्रामपंचायत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात ई-ऑफिस प्रणालीचा वापर करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. कार्यालयीन कामकाजातील पारदर्शकता, गतिमान सेवा आणि नागरिकाभिमुख प्रशासन या दृष्टीने ग्रामपंचायतीने केलेले कार्य इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, प्रभारी उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील आणि ग्रामसेविका तृप्ती राणे उपस्थित होत्या. ग्रामसेविका तृप्ती राणे यांनी सादरीकरणाद्वारे विविध योजनांची माहिती दिली, तर सरपंचांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

​भेटीदरम्यान विभागीय आयुक्तांनी ‘उमेद’ अभियानांतर्गत कार्यरत महिला बचत गटांच्या स्थानिक उत्पादनांची पाहणी केली आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबद्दल समाधान व्यक्त केले. उत्पादनांची गुणवत्ता व बाजारपेठेतील पोहोच वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी श्री. परब यांच्या घरकुलाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व संवाद साधला. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने सक्रिय राहावे, असे सांगत लोकसहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या समन्वयातूनच ग्रामीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.