दोडामार्ग:प्रतिनिधी
तालुक्यात अमली पदार्थांचा (ड्रग्स) वाढता शिरकाव, पर्यटनस्थळांवरील हुल्लडबाजी, बेकायदा दारूविक्री आणि जुगाराचे अड्डे यांमुळे बिघडत चाललेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी शुक्रवारी दोडामार्ग येथे एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधी, सरपंच आणि नागरिकांनी तालुक्यातील गंभीर समस्यांचा पाढाच एसपींसमोर वाचला. पुढील ८ ते १० दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र नाराजी व्यक्त करण्याचा इशाराही लोकप्रतिनिधींनी दिला आहे.
ड्रग्सचा विळखा आणि पोलिसांच्या ‘सेटलमेंट’वर आक्षेप
बैठकीत सीमावर्ती भागातील ड्रग्सचा वाढता प्रसार हा सर्वात चिंतेचा विषय ठरला. अनेक गावांतील तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, अशी भीती उपस्थितांनी व्यक्त केली. “गोवा पोलिस ड्रग्सविरोधात मोठी कारवाई करतात, मग स्थानिक पोलिस शांत का?” असा रोकडा सवाल यावेळी विचारण्यात आला.
भाजप तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस यांनी काही प्रकरणांमध्ये पोलिसांकडून ‘सेटलमेंट’ केली जात असल्याचा गंभीर दावा केला. यावर एसपी डॉ. दहिकर यांनी, “कोणत्याही तक्रारीची निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि अधिकारी दोषी आढळल्यास पाठीशी न घालता तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट आश्वासन दिले.
‘या’ गावांमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट
बैठकीदरम्यान आणि त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तालुक्यातील काही विशिष्ट भागांतील अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना दिली
माटणे-आबडगाव येथे थेट शाळेच्या शेजारी आणि इतर ३ ठिकाणी बेकायदा दारूविक्री सुरू आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणावर जुगार खेळवला जात असल्याची तक्रार करण्यात आली. गावांमधील महिलांनी यापूर्वीही तक्रार करून दारूविक्री बंद करण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप कारवाई झालेली नाही.
कुडासे तिठा या मुख्य रस्त्यावरच खुलेआम दारूविक्री होत असून, कुडासे परिसरात ड्रग्सचे जाळे पसरत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
साटेली-भेडशी या परिसरातही अवैध दारूचा धंदा तेजीत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. या सर्व तक्रारींवर तातडीने कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी आणि ‘चॉपर’ची दहशत
दोडामार्गमधील पर्यटनस्थळांवर मद्यधुंद पर्यटकांचा उच्छाद वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच नगराध्यक्षांच्या भावाला चाकू (चॉपर) दाखवून धमकावल्याची घटना घडल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलांच्या अशोभनीय वर्तनामुळे स्थानिक कौटुंबिक वातावरण बिघडत असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली. धाबा मालक पर्यटकांवर थेट कारवाई करू शकत नसल्याने पोलिसांनी येथे गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.
माहिती लपवणाऱ्यांची तक्रार थेट माझ्याकडे करा: एसपी
अनेक गावांमध्ये अवैध धंदे सुरू असतानाही स्थानिक ‘पोलीस पाटील’ पोलिसांना योग्य माहिती देत नसल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली. यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कडक भूमिका घेत सांगितले की, “जर पोलीस पाटील किंवा इतर कोणी माहिती लपवत असेल, तर त्याची तक्रार थेट माझ्याकडे करा. नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी कोणत्याही भीतीशिवाय ८ दिवसांत मला माहिती द्यावी, त्यावर तातडीने कडक कारवाई केली जाईल.”
कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही: एसपी डॉ. मोहन दहिकर
“कायद्याच्या अंमलबजावणीत कोणालाही विशेष सवलत मिळणार नाही. पर्यटनस्थळांवरील वाहतूक कोंडी, गर्दी आणि हुल्लडबाजी रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातील. कोणताही पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास गय केली जाणार नाही. कायदा मोडणाऱ्यांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी स्पष्ट केले
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, जिल्हा परिषद सदस्या साक्षी तळवडेकर, राजेंद्र निंबाळकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, प्रेमानंद देसाई, गोपाळ गवस, संजय गवस, आनंद तळणकर, प्रवीण गवस, मदन राणे, दिनेश नाईक, शैलेश दळवी, बाळा नाईक, संदेश राणे, विशान्त तळणेकर, संतोष नानाचे, अनिल शेटकर, गावडे यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













