दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये राबविला ‘ओपन एग्रीकल्चर क्लासरूम’ उपक्रम…

विद्यार्थ्यांसमोर शेती शिक्षणाचा अनोखा आदर्श

वेंगुर्ले : दाजी नाईक

दाभोली इंग्लिश स्कूल, दाभोली येथे राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब) आणि बहुविध कौशल्य अभ्यासक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेला ‘ओपन एग्रीकल्चर क्लासरूम’ हा अभिनव उपक्रम पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध कौशल्य अभ्यासक्रमाच्या निदेशकांच्या उत्स्फूर्त सहभागातून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राष्ट्रीय कृषी दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पालक प्रतिनिधी श्री. राजन कोंडूरकर यांच्या हस्ते ट्रॅक्टर पूजन करून करण्यात आली. यावेळी पालक श्री. नरेंद्र तोरस्कर, श्री. पपन मालवणकर, शिक्षिका सौ. रेश्मा चोडणकर, श्री. वसंत पवार सर तसेच बहुविध कौशल्य अभ्यासक्रमांतर्गत बागकाम आणि शेती तंत्रज्ञान विभागाच्या निदेशिका प्रतीक्षा पोईपकर मॅडम, कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान विभागाचे निदेशक श्री. दत्तप्रसाद सांगेलकर, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभागाच्या निदेशिका सौ. पल्लवी चिंदरकर, ऊर्जा आणि पर्यावरण विभागाचे निदेशक श्री. अमोल मसुरकर तसेच श्री. नितीन घोगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात प्रत्यक्ष शेतीकामातून करण्यात आली. पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे जमिनीची मशागत करून सेंद्रिय खतांचा वापर केला. त्यानंतर सरी-वरंबा व गादीवाफे तयार करून हळद, मिरची, वांगी, दुधी भोपळा, चिबूड भोपळा, वाल, झेंडू तसेच विविध शोभिवंत वनस्पतींची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभागातून शेतीतील मूलभूत तंत्रे, पीक लागवडीच्या पद्धती आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व अनुभवातून जाणून घेतले.

यावेळी श्री साई एजन्सी यांच्या सहकार्याने कृषी दिनानिमित्त आधुनिक कृषी अवजारांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच श्री. रवींद्र प्रभू (कुडाळ) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. साई श्री एंटरप्रायझेस, वेंगुर्ला येथील श्री. घाटकर सर यांनी विविध कृषी अवजारांची सविस्तर माहिती देत त्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे महत्त्व, अवजारांचा योग्य वापर आणि त्यांची उपयुक्तता याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. किशोर सोन्सूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या शिक्षणपद्धतीत शेती शिक्षणाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. भविष्यात शेती हा स्वतंत्र विषय अभ्यासक्रमात समाविष्ट होणे आवश्यक असून, शेती करणे आणि ती टिकवून ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शेतीकडे केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर जीवनमूल्ये आणि पर्यावरण संवर्धनाशी जोडलेली जीवनशैली म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शेतात काम करणाऱ्या सर्वांसाठी चुरमुऱ्यांची भेळ तयार करून सर्वांना तिचा आस्वाद दिला. या माध्यमातून श्रमसंस्कार, सहकार्याची भावना आणि सामूहिक कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले.

या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षक, विविध कौशल्य अभ्यासक्रमाचे निदेशक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण करणे, सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देणे, पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे आणि पालकांचा शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढविणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

उपस्थितांनी या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक करत भविष्यातही अशा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. किशोर सोन्सूरकर यांनी सर्व मान्यवर, पालक, शिक्षक, विद्यार्थी, सहकार्य करणाऱ्या संस्था व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.