छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेची शासनाकडे मागणी
वेंगुर्ले : प्रतिनिधी
शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी बंद करुन ती सहाय्यक ए. आय. द्वारे करण्याचे शासन स्तरावरुन निश्चित केलेले आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्हयाचा भौगोलिकदृष्ट्या विचार करुन (उदा. एका शेतकऱ्यांची ५ गुंठे १० गुंठे असे सर्व्हे नं. असून) डोंगराळ भागात हे सहाय्यकांना शक्य होणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यामुळे केवळ सिंधुदुर्ग मध्ये बंद केलेली ई पीक पाहणी शेतकरी स्तरावरुन लॉगिनने पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना व शेतकऱ्यांतर्फे शासनाकडे करण्यात आली आहे.
शासनाकडे मागणी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आता ई पीक पाहणी शेतकरी स्तरावर कायमची बंद करून सहाय्यक स्तरावर केली जाणार आहे. आणि ती सुद्धा एआयद्वारे, यामुळे एक सहाय्यक अख्या गावाला न्याय देऊ शकत नाही. शेतकऱ्याच्या प्रत्येक क्षेत्रात बांधावर जाऊन ही पीक पाणी करावी लागेल. सर्व्हे नंबर मधील सर्व शेतकरी एकाच वेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा त्या सर्वे नंबरची ई पिक पाहणी पूर्ण होणार नाही, सातबारातील काही शेतकरी हे बाहेर गावी, मुंबई व अन्य या ठिकाणी नोकरी निमित्त असतात. त्यामुळे त्यांची ई पीक पाहणी वेळेत न झाल्यास स्थानिक शेतकरी याची ई पीक पाहणी होणार नाही. याशिवाय सर्व्हर हँग होणे, नेटवर्क नसणे, हे प्रॉब्लेम प्रत्येक वेळी असणारच. यामुळे शेतकऱ्यांची पीक पाणी वेळेत होऊ शकत नाही.
यामुळे शेतकरी पिक विमा, शेती कर्ज, नुकसान भरपाई यासारखे लाभापासून शेतकरी वंचित राहील. शासनाने या जाचक अटी रद्द करण्याची गरज आहे. सहाय्यक देऊ शकणार नाहीत. व त्याही पुढे जाऊन विचार केला तर डोंगराळ, भागात व नदी तसेच दोन किलो मिटर शेती बागायतीचे वेगवेगळे सर्व्हे नंबर असून त्यात अनेक सहाय्यक हा महिला वर्गातील असल्यामुळे एवढे डोंगराळ भागात सद्यस्थितीत असणारा वन्य प्राण्यांचा धुमाकुळ लक्षात घेता महिला वर्ग सहाय्यक यांना सुद्धा भीतीचे वातावरण असून त्याचप्रमाणे व त्या क्षेत्रात जाऊन ई पीक पाहणी करणे हे शक्य होणार नाही. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान आहे. त्यापेक्षा पूर्वी प्रमाणेच जी ई पीक पाहणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून करुन घेणे, न पेक्षा यात योग्य वेळेत जर ई पीक पाहणी न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार या मागणीचा विचार करुन अट शिथिल करावी. पूर्वीप्रमाणेच ई पीक पाहणी हे लॉगिन शेतकरी स्तरावरुन होणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही, असे शेतकरी वर्गातून संघटनेमार्फत मत व्यक्त केले जात आहे. यावर तात्काळ लक्ष घालून शासनाने लवकरात लवकर विचार करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार राजन गवस यांना शेतकरी शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय यांच्या नेतृत्वाखाली यशवंत परब, सुनील परब, रमेश पांगम, महादेव पेडणेकर यांनी सादर केले. पालकमंत्री नीतेश राणे यांनीही यात लक्ष घालून शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडवावा अशी मागणी श्री. राय यांनी केली आहे.












