घरे, महावितरण विभागाचे मोठे नुकसान
झाडे कोसळून घरांचे नुकसान.! ३ ते ४ वीज खांब जमीनदोस्त
तब्बल १० तास अंधारात गाव
कणकवली : तालुक्यातील कलमठ गावावर रविवारी सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने अक्षरशः कहर केला. वादळाच्या तडाख्यात गावडेवाडी व गुरववाडी परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर महावितरणचे ३ ते ४ वीज खांब कोसळल्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा तब्बल १० तास खंडित झाला. अनेक घरांचे नुकसान झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वादळामुळे श्रीधर हरमलकर यांच्या घरावर झाड कोसळून घराच्या छपराचे मोठे नुकसान झाले. तसेच राजकिरण पवार यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने घराचे नुकसान झाले. गावातील इतर काही ठिकाणीही झाडे कोसळून मालमत्तेचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच सरपंच संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरु वर्देकर, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय तळवडेकर, तलाठी गोजिरी गोडे तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

वादळात पडलेली झाडे हटविणे, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत दिवसभर मेहनत घेत कोसळलेले वीज खांब उभे करून तुटलेल्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती केली. जवळपास १० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.












