वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देवगड तालुक्याला तडाखा; कुणकेश्वर, मणचे, शिरवलीत घरांचे नुकसान

देवगड तालुक्यात जुलै महिन्यातच पावसाने केला एक हजाराचा टप्पा पार

देवगड, (प्रतिनिधी )

देवगड तालुक्यात रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांचे व झाडांचे नुकसान झाले. कुणकेश्वर, मणचे आणि शिरवली परिसरात घरांच्या छपरांवरील सिमेंट पत्रे उडणे, भिंती कोसळणे तसेच झाडे घरांवर पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला असे असूनही पावसाने जुलै च्या पाच तारीख पर्यंत एक हजाराचा टप्पा देखील पूर्ण केला आहे. रविवारी १०६ मिली मीटर एका पाऊस तालुक्यात झाला.

कुणकेश्वर येथील सत्यवान दत्ताराम कुणकेश्वरकर यांच्या घराच्या सिमेंट पत्र्याच्या छपराचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले असून संबंधित पंचनामा स्वतंत्रपणे सादर करण्यात येणार आहे. मणचे येथील गोविंद तुकाराम गुरव यांच्या घराची भिंत पावसामुळे कोसळली असून त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिरवली येथील मंगेश भिकाजी कदम यांच्या घरावर सागाचे झाड कोसळल्याने छपराचे नुकसान झाले असून या घटनेतही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या दोन्ही घटनांचे पंचनामेही लवकरच सादर करण्यात येणार आहेत.

दरम्यान, सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक सखल भागांतील रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी देवगड तालुक्यात सुमारे १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामात आतापर्यंत १,०५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.