श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान लांजाच्यावतीने शहरातून काढण्यात आली हिंदवी स्वराज्य स्वतंत्र दिन पदयात्रा

लांजा (प्रतिनिधी) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान लांजाच्या वतीने मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी लांजा शहरातून हिंदवी स्वराज्य स्वतंत्र दिन पदयात्रा काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते.
हिंदुस्थानाची पताका ही प्रभु श्रीराम ते श्री शिव शंभु छत्रपती यांची भगवीच असली पाहिजे, ह्या उदात्त अंतकरणाने १५ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी हिंदवी स्वराज्य स्वतंत्र दिन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते . शहरातील योगी हॉटेल समोरील पटांगण येथून या पदयात्रेला सुरुवात झाली. श्रीराम मंदिर लांजा येथे भारत मातेचे पूजन करून ही पदयात्रा बसवेश्वर चौक येथे जाऊन तिथून ती बाजारपेठ मार्गे साटवली तिठ्यातून केदारलिंग मंदिर येथे समारोप करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ.समीर घोरपडे म्हणाले की, १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाचे दोन तुकडे करण्यात आले, फाळणी करण्यात आली.ही फाळणी धर्माच्या आधारावर करण्यात आली. आणि दुसऱ्या दिवशी खंडित भारताचे स्वातंत्र्य भारतवासीयांना देण्यात आले. आम्हाला स्वातंत्र्य मिळाले ते सुद्धा खंडित स्वातंत्र्य मिळाले. याचे शल्य प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये कायमच राहील. जोपर्यंत हा फाळणी झालेला भारत पुन्हा मिळवू तोपर्यंत अखंड भारत संकल्प दिन आपण साजरा करायचा आहे. तर विश्व हिंदू परिषद, महिला विभागाच्या श्रीमती मराठे यांनी विचार मांडताना सांगितले की, भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळेस सहा लाख हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. हिंदूंची समृद्ध संस्कृती उध्वस्त करण्यात आली. हिंदू धर्माचे प्रचंड नुकसान झाले. ही झालेली हानी परत भरून काढता येणार नाही. पण असेच देशाचे तुकडे होत राहिले तर मात्र प्रत्येकाच्या जीविताला धोका संभवतो. यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांनी धर्मयोद्धा व्हायलाच पाहिजे.

अखंड भारत संकल्प दिन पदयात्रेचे सूत्रसंचालन विश्व हिंदू परिषद लांजा प्रखंड मंत्री वंदा जेधे यांनी केले.या पदयात्रेत सर्वजण उत्स्फूर्त पणे ‘भारत मातेचा विजय असो’, ‘वंदे मातरम’ अशा देश प्रेमाने भरलेल्या घोषणा देत होते.पदयात्रेच्या पुढे तिरंगा धरण्यात आला होता या पदयात्रेत अडीचशे नागरिक सहभागी झाले होते.