चिपळूण | प्रतिनिधी:
चिपळूण शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शहरातील पेठमाप व शंकरवाडी परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी शिक्षण सभापती तथा नगरसेविका हर्षालीताई पवार, नगरसेवक प्रमोद बुरटे, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेवक संजय गोताड तसेच नगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्याचे, नाले व गटारांतील अडथळे दूर करण्याचे तसेच आवश्यक त्या सर्व उपाययोजना तात्काळ राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पावसाचा जोर कायम असतानाही नगराध्यक्षांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शहरातील संवेदनशील भागांमध्ये पाणी साचू नये, पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करा. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधा.”
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी मुसळधार पावसात प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून केलेल्या पाहणीमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिकांनी त्यांच्या तत्परतेचे कौतुक करत, संकटाची वाट न पाहता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीबद्दल समाधान व्यक्त केले.
चिपळूण नगर परिषदेकडून शहरातील संवेदनशील भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, सतर्क राहावे आणि केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.













