काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष निर्मला जाधव यांची मागणी
चिपळूण (प्रतिनिधी) : सध्या सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे शहरातील अनेक जुन्या इमारतींच्या छतावरील गंजलेले व सैल झालेले पत्रे धोकादायक ठरत आहेत. वाऱ्याच्या झोतामुळे ही पत्रे सतत हलत असून, काही ठिकाणी ती कोणत्याही क्षणी खाली कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
आमच्या परिसरातील एका इमारतीवरील जुनी पत्रे वाऱ्यामुळे सतत हलत असून, जोरदार आवाज करत आहेत. हा आवाज इतका मोठा असतो की परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा आवाज अधिक तीव्र होत असल्याने अनेक रहिवाशांची झोप उडत आहे. कोणत्याही क्षणी पत्रे खाली पडतील, या भीतीमुळे नागरिक सतत धास्तावलेल्या अवस्थेत राहत आहेत. या मार्गावर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिकांची दिवसभर मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वीच संबंधित इमारत मालकांनी तातडीने या पत्र्यांची दुरुस्ती अथवा बदल करून घ्यावा. तसेच नगरपालिकेने शहरातील अशा धोकादायक इमारतींची तातडीने पाहणी करून संबंधित मालकांना नोटिसा बजावून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. सर्व बिल्डिंग मालकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या इमारतीची वेळोवेळी तपासणी करून सैल झालेले पत्रे, छतावरील धोकादायक साहित्य किंवा इतर जीर्ण भाग तातडीने दुरुस्त करून घ्यावेत. थोड्याशा निष्काळजीपणामुळे मोठा अपघात घडू शकतो.
नागरिकांनाही आवाहन करण्यात येते की, जोरदार पाऊस व वारा सुरू असताना जीर्ण इमारती, सैल पत्रे किंवा धोकादायक बांधकामांच्या परिसरात अनावश्यक थांबू नये. स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि अशा ठिकाणी धोका आढळल्यास त्वरित संबंधित प्रशासनाला माहिती द्या. “अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा, अपघात होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हीच खरी जबाबदारी आहे.” या संपूर्ण प्रकरणाकडे नगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष नर्मला जाधव यांनी केली आहे.













