पाणी वाचविण्याचे नागरिकांना आवाहन
शाळा-महाविद्यालयात करणार जनजागृती हॉटेल
लॉज, वसतीगृहचालकांची घेणार बैठक; पाहाणी पथक नेमणार
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरात यावर्षी पाण्याची टंचाई भासू नये यासाठी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने आतापासूनच पुढाकर घेतला असून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांनी आपल्या आजूबाजूला असलेली गळती नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून द्यावी. घरात गरजेपुरतेच नळ वापरावे. नळाच्या लाईन उघड्या ठेवू नयेत, असे आवाहन पाणी समितीचे सभापती निहार कोवळे यांनी केले आहे. पाणी समिती शहरातील शाळा, महाविद्यालयात जाऊन, शहरात पत्रके वाटून पाण्याचे महत्व अधोरेखीत करणार असून जनजागृती करणार आहेत. कचरागाडीवरूनही जागृती संदेश देण्यात येणार आहे. प्रभागनिहाय पाहणी पथक नेमून पाणी कुठे वाया जात नाही ना? तसेच कोठे गळती असेल तर ती तातडीने दुरुस्त केली जाणार आहे. एकूणच पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी पाणी समिती अॅक्शनमोडवर आली आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक
चिपळूण नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक मंगळवार दि. २७ रोजी नगराध्यक्ष उमेश सकपाळ व उपनगराध्यक्ष सौ. रूपाली दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी सभापती निहार कोवळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य शशिकांत मोदी, अंकुश आवले, साजिद सरगुरो, संजय गोताड, संदीप भिसे, योगेश पवार, पाणी पुरवठा विभागाचे ओंकार भूरण व अन्य कर्मचारी उपस्थित होते. या सभेत शहरात होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईबाबत गांभिर्याने विचार करण्यात आला. सर्वांनी एकत्र येऊन नागरिकांच्या साथीने या संकटावर मात करावी, असे आवाहन सभापती निहार कोवळे यानी केले आहे.
गळती तातडीने काढणार
शहरातील विविध भागात पाईपला गळती असल्याचे निदर्शनास येत आहे याबाबत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रभागनिहाय पाहाणी करून गळती काढली जाईल. शिवाय भविष्यात यासाठी व्हॉटस अॅपवर एक ग्रुप तयार करून प्रत्येक प्रभागातील गळतीबाबत माहिती घेतली जाईल व तेथे तातडीने दुरुस्ती केली जाईल. महामार्गाचे काम करताना काही ठिकाणी पाईप लाईनचे काम पूर्ण झाले नसल्याने तेथे पाणी वाया जाते याबाबत राष्ट्रीय महामार्ग खात्याला अवगत करण्यात आले असून त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरु आहे.
पाण्याचा अपव्यय टाळा नाहीतर पाणी कपात शक्य
शहरातील नागरिकांना पाण्याचा अपव्यय आतापासून टाळला पाहिजे. आंघोळीसाठी शॉवर न वापरता बादलीने पाणी घ्यावे, ब्रश करताना नळ चालू ठेवू नये, घरातील नळ तुटले असतील किंवा नळच नसतील तर ते तातडीने बसवून घ्यावे, गरजेपुरतेच पाणी वापरावे. शक्य तेथे पाण्याचा पुनर्रवापर करावा. जर आपण पाणी जपून वापरले नाहीतर भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. सध्या शहरात एक तास पाणी सोडावे लागते ती वेळ कमी करून पाणी कपात करावी लागेल.
फ्लोट वॉल बॉल कॉक लावणे
शहरातील अपार्टमेंट किंवा खाजगी घरांसाठी नगरपरिषदेची स्वतंत्र पाणी जोडणी दिलेली आहे. अनेकवेळा हे पाणी थेट साठवण टाकीत किंवा प्लास्टिकच्या मोठ्या टाकीत सोडले जाते, पाणी भरल्यावर ती टाकी तशीच वाहत राहाते यामुळे मोठ्याप्रमाणावर पाणी वाया जाण्याची शक्यता असल्याने अशा टाक्यांना फ्लोट वॉल बॉल कॉक लावावा असे आवाहन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले असल्याचे सभापती निहार कोवळे यांनी बैठकीत सांगितले.
शाळांमध्ये जनजागृती, वॉटर मॉनिटर नियुक्ती
शहर व परिसरातील शाळा महाविद्यालयोत पाणी समिती जाऊन मुख्याध्यापकांशी समन्वय साधणार आहे. तेथे विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व सांगून पाणी कसे वापरावे याबाबत प्रचार प्रसार व्हावा म्हणून जनजागृती करणार आहे. प्रत्येक वर्गासाठी एक वॉटर मॉनिटर नेमला जाईल तो पाण्याच्या नियंत्रणावर लक्ष ठेवील व इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करील. शाळा परिसरात पाणी गळती झाल्यास संबंधितांशी संपर्क साधेल.
टास्कफोर्स व पाहाणी पथक नेमणार
शहरातील पाण्याची गळती रोखावी तसेच पाण्याचा अपव्यय टळावा यासाठी टास्कफोर्स नियुक्त केले जाणार आहे. त्यासाठी एक व्हाट्सअॅप ग्रुप करून तेथे नियमित आढावा घेतला जाईल. कोठे पाणी गळती झाली, काही समस्या उद्भवली तर नगर परिषदेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहाणी करतील व सदर समस्या मार्गी लावतील. प्रत्येक प्रभागासाठी पाणी समिती व अधिकाऱ्यांचे पाहणी पथक कार्यरत असेल. जेथे पाण्याचा अपव्यय केला जाईल तेथे हे पथक जाऊन संबंधित नागरिकाला समज देतील, जाब विचारतील. संबंधित प्रभागतील नगरसेवकाना सोबत घेऊन हे पथक प्रभागात फिरेल व पाहाणी करेल.
हॉटेल, लॉजिंग, वसतिगृहाची बैठक
शहरात असलेले हॉटेल्स, लॉजिंग व वसतीगृहात अधिक पाण्याचा वापर केला जातो. येथे पाण्याचा वापर कमी करावा व पाणी वाया जाऊ नये यासाठी संबंधित अस्थापनांच्या मालकांची बैठक घेण्यात येईल. त्यांच्याशी चर्चा करून धोरण ठरविले जाईल.
गाड्या धुऊ नयेत
सध्या संभाव्य दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने शहरात पाणी जपून वापरावे यासाठी नागरिकांनी गाड्या धुऊ नयेत, रस्त्यावर पाणी ओतून पाण्याची नासाडी करू नये. नागरिकांनी याची दखल घेऊन नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहनही निहार कोवळे यांनी केले आहे.
पेठमाप, गोवळकोटला टँकरने पाणी पुरवठा
पेठमाप व गोवळकोट भागात, सध्या मधूळ व खारट पाण्याचा पुरवठा होत आहे. सध्या कोयनेतून वाशिष्ठी नदीला पुरेसे पाणी सोडले जात नाही. त्यामुळे खाडी पर्यंत गोडेपाणी पोहचत नाही. आमावश्या व पौर्णिमेला उधाणाची भरती असते अशावेळी समुद्राचे खारेपाणी खाडीत घुसते व तेच पाणी गोवळकोट जॅकवेलमधून नळाद्वारे सोडले जाते. सध्यातरी आपण याबाबत काही करू शकत नसल्याने पेठमाप, गोवळकोटला टँकरने पाणी पुरवठा करीत आहोत. नागरिकांनीही पिण्याच्या पाण्याचा साठा करावा व इतर वापरासाठी नळाचे पाणी घ्यावे असे सूचविण्यात आले आहे.
प्लंबरची यादी प्रसिद्ध करणार
नागरिकांच्या घरात नळाच्या किंवा पाईप लाईनच्या काही समस्या असतात अशा वेळी त्यांना प्लंबर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे समस्या रखडतात व पाणी वाया जाते यासाठी नगरपरिषदेतर्फे ८ ते १० प्लंबरची यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यांना बोलावून नागरिक आपली समस्या दूर करू शकतात. त्याचे बिलही नागरिकांनीच द्यायचे आहे. नागरिकांनी संभाव्य संकट ओळखून जबाबदारीने पाण्याचा वापर करावा. वॉशिंगमशिन फुल लोडला वापरावी, ब्रश करताना बेसिनचा नळ चालू ठेवू नये, आंघोळीसाठी शॉवर वापरू नये, झाडांना पाणी घालताना वापरलेले पाणी घालावे, कमीत कमी पाण्याचा वापर हेच पाण्याचे संवर्धन आहे याची जाणीव ठेवून पाण्याचा कमी वापर करा, असे आवाहन पाणी सभापती निहार कोवळे यांनी केले आहे.













