सावंतवाडी टर्मिनसवर ‘राजधानी’सह ३ महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर

खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मुख्यमंत्र्यांना अधिकृत मंजुरीचे पत्र

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
कोकणच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये अत्यंत मोठी आणि महत्त्वपूर्ण भर पडली आहे. सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनसवर प्रवाशांच्या सोयीसाठी तीन अत्यंत महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना व्यावसायिक थांबा देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. यामध्ये देशातील प्रतिष्ठेची ‘राजधानी एक्स्प्रेस’ आणि ‘गरीब रथ’ यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या थांब्यांसाठी विशेष पाठपुरावा केला था. त्यांच्या या मागणीला आणि प्रयत्नांना अखेर मोठे यश आले असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील अधिकृत मंजुरीचे पत्र जारी केले आहे.

​कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या गरीब रथ व राजधानी एक्सप्रेस या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी आणि त्यांना सावंतवाडी येथे थांबा मिळण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटना सतत प्रयत्नशील होत्या. त्यानंतर याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. या गंभीर समस्येची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना २५ मार्च २०२६ रोजी लेखी पत्र पाठवून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर जनसुविधेच्या दृष्टीने गाड्या थांबवण्याची आग्रही मागणी केली होती. या संपूर्ण प्रक्रियेत खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने केंद्रीय पातळीवर आणि मुख्यमंत्र्याकडे केलेला विशेष पाठपुरावा अत्यंत निर्णायक ठरला.

​केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीनुसार आता सावंतवाडी रोड स्थानकावर गाडी क्र. १२१३३ / १२१३४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – मंगळुरू एक्स्प्रेस, गाडी क्र. १२४३१ / १२४३२ तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आणि गाडी क्र. १२२०१ / १२२०२ लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्स्प्रेस या तीन महत्त्वाच्या गाड्यांना व्यावसायिक थांबा मिळणार आहे.
​या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि विशेषतः सावंतवाडी परिसरातील नोकरदार, व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास आता अधिक जलद आणि सोयीचा होणार आहे. या नवीन थांब्यांमुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, स्थानिक आर्थिक विकासालाही गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा प्रलंबित प्रश्न सुटल्याने संपूर्ण कोकण विभागातील रेल्वे प्रवाशांमधून अत्यंत समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्णयाबद्दल लोकप्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहेत.