चिपळूण | प्रतिनिधी:
कोयना धरणाच्या जनरेशनसाठी पाणी सोडण्यात आल्याने चिपळूण शहरातील नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे एनरॉन पुल परिसरातील एका घरामध्ये एक कुटुंब अडकून पडले होते. वाढत्या पाण्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती.
या घटनेची माहिती नगरसेवक प्रमोद बुरटे यांना मिळताच त्यांनी तात्काळ नगराध्यक्ष उमेश दादा सकपाळ यांना कळवली. त्यानंतर नगराध्यक्ष उमेश दादा सकपाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी त्वरित समन्वय साधून बचावकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
आपत्ती व्यवस्थापन पथकाने दोरी तसेच इतर आवश्यक बचाव साहित्याच्या साहाय्याने धाडसी आणि नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत अडकलेल्या कुटुंबाची सुखरूप सुटका केली. वेळेत करण्यात आलेल्या या कार्यवाहीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या बचावकार्यात नगराध्यक्ष उमेश दादा सकपाळ, बांधकाम सभापती कपिल शिर्के, उपमुख्य अधिकारी प्रमोद ठसाळे, नगरसेवक प्रमोद बुरटे, मंगेश पेढामकर, बापू साडविलकर, रतन पवार, सुयोग चव्हाण, दयानंद जुवळे, निलेश किंजळकर, अजय कासारे, गोट्या मोहिते, इकबाल इरफान, सिद्धेश रेडीज, निखिल शेट्टी तसेच स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांच्या समन्वयातून बचावकार्य यशस्वीरित्या पूर्ण झाले.
पावसाचा जोर आणि नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.












