भारतीय इंजिनिअरवर पत्नीच्या हत्येचा आरोप; प्रेमसंबंधाच्या संशयातून खळबळजनक खुलासा

 

पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप; डिजिटल पुराव्यांमुळे संशय अधिक गडद
प्रेयसीशी संपर्क, स्मार्ट लॉकची माहिती आणि फोन रेकॉर्ड्स तपासात महत्त्वाचे

अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात एका भारतीय इंजिनिअरवर पत्नीची हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अविनाश नार्णे याच्यावर पत्नी रजिनीच्या गळा आवळून खून केल्याचा आरोप असून पोलिसांनी डिजिटल पुरावे आणि फोन रेकॉर्ड्सच्या आधारे तपासाचा वेग वाढवला आहे. प्राथमिक तपासात हा खून नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच विवाहानंतरही त्याचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याची बाबही तपासात समोर आली आहे. या प्रकरणामुळे अमेरिकेसह भारतीय समाजातही मोठी खळबळ उडाली आहे.


वॉशिंग्टन : एकीकडे पती-पत्नीमधील गुन्हेगारी घटनांमुळे देशभरात चर्चा सुरू असताना, अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातून समोर आलेल्या एका प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ३० वर्षीय भारतीय इंजिनिअर अविनाश नार्णे याच्यावर त्याची पत्नी रजिनी हिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ५ मे २०२५ रोजी ती घरात मृतावस्थेत आढळून आली होती. सुमारे नऊ महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी अविनाशला अटक केली असून त्याच्यावर गंभीर गुन्ह्याखाली कारवाई करण्यात आली आहे. दोष सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हा गुन्हा नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा संशय आहे. एवढेच नव्हे तर, अविनाशचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचाही दावा करण्यात आला आहे. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, पत्नीच्या मृत्यूनंतरच्या दिवशी त्याने तिचा फोटो आपल्या प्रेयसीला पाठवल्याचे तपासात समोर आले असून, याबाबत त्याने कबुली दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

५ मे २०२५ रोजी आपत्कालीन सेवेला फोन करून अविनाशने पत्नी बाथरूममध्ये असल्याचे आणि ती प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना रजिनी मृतावस्थेत आढळली. डॉक्टरांनी तिला घटनास्थळीच मृत घोषित केले. सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद मानला गेला; मात्र शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाची हत्या म्हणून नोंद करण्यात आली.

घटनेच्या दिवशी आपण काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर गेलो होतो, असे अविनाशने पोलिसांना सांगितले होते. परत आल्यानंतर पत्नीने बाथरूमचे दार आतून बंद केल्याचे आणि प्रतिसाद न दिल्याचे त्याचे म्हणणे होते. मात्र तपासादरम्यान मिळालेल्या स्मार्ट लॉक, सुरक्षा यंत्रणा आणि इतर डिजिटल पुराव्यांमुळे त्याची ही कहाणी संशयास्पद ठरली. घरात बाहेरून कोणी प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा न मिळाल्याने अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा दावा कमकुवत ठरल्याचे पोलिसांनी नमूद केले.

तपासादरम्यान पोलिसांनी फोन रेकॉर्ड्स, डिजिटल माहिती आणि वैयक्तिक संबंध यांची सखोल चौकशी केली. त्यातून विवाहापूर्वीपासून अविनाशचे भारतातील एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. संबंधित महिला या जोडप्याच्या विवाहालाही उपस्थित होती, असा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. विवाहानंतरही हे संबंध कायम राहिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, पत्नीचा मृत्यू झालेल्या दिवशी अविनाशने आपल्या प्रेयसीला किमान चार वेळा फोन केला होता. विशेष म्हणजे, तो बाथरूमचे दार उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत असतानाच हे कॉल करण्यात आल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. तसेच पत्नीच्या मृत्यूनंतर तिचा फोटो प्रेयसीला पाठवल्याची बाबही तपासात समोर आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.