जल जीवन मिशन योजनेमधील काडवली येथील नळ पाणी योजना निधी अभावी रखडली

पावसाळ्यानंतर देखील नळपाणी योजनेचे काम पूर्ण व्हावे; ग्रामस्थांची मागणी

चिपळूण (प्रतिनिधी):- जल जीवन मिशन योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील काडवली येथील नळ पाणी योजनेच्या कामाला गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. मात्र, अद्यापही या नळ पाणी योजनेचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. आमच्या घराघरातून नळाद्वारे पाणी कधी येणार ? असा सवाल येथील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

‘जल जीवन मिशन’ ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्याद्वारे प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे शुद्ध आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे मुख्य वैशिष्ट्ये आहे. यानुसार खेड तालुक्यातील काडवली गावासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत काडवली गावात पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये चौरसवाडी, गजवाडी, डांगेवाडी, हिरवेवाडी, झगडेवाडी असे हे टप्पे आहेत. चौरसवाडी अंतर्भूत असलेल्या वाड्यांना काडवली -निरबाडे वैतरणा नदीवरून पाणी उचलून पुरवठा केला जाणार आहे. यासाठी नदीकिनारी विहिरीचे बांधकाम व ऊर्ध्व वाहिनी, साठवण टाकी, पंप गृह अशी कामे पूर्णत्वास गेली आहेत. वितरण वाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. तर पंपिंग मशीनरीचे काम शिल्लक राहिले आहे. यामुळे चौरसवाडी अंतर्भूत असलेल्या वाड्यांना पाणीपुरवठा दोन वर्षानंतर देखील होऊ शकलेला नाही.

हीच परिस्थिती गजवाडी, डांगेवाडी, हिरवेवाडी, झगडेवाडी येथे देखील आहे. यामध्ये गजवाडी येथील नळ पाणी योजनेसाठी विहीर बांधकाम, ऊर्ध्व वाहिनी, पंपगृह, वितरण वाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पंपिंग मशीनरी व साठवण टाकीचे काम अजून पूर्णत्वास गेलेली नाही. डांगेवाडी, हिरवेवाडी, झगडेवाडी येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत विंधन विहीर, ऊर्ध्व वाहिनी, वितरण वाहिनी व पंप गृहाचे काम पूर्ण झाले आहे. तर डांगेवाडी व हिरवेवाडी, झगडेवाडी येथील पंपिंग मशिनरी, पाऊस पाणी संकलन टाकी, साठवन टाकी अशी कामे अजून व्हायची आहेत.

एकंदरीत, कामाचा कालावधी पाहता तितकीशी कामे पूर्णत्वास न गेल्याने काडवली गावाला उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पावसाळ्यानंतर तरी ही कामे पूर्णत्वास जावीत, अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे.

ठेकेदाराला केवळ १६ लाख रुपये अदा

दरम्यान, या नळपाणी योजनेचे सुमारे ८१ लाख २२ हजार पर्यंतचे काम झाले आहे. मात्र, ठेकेदाराला केवळ १६ लाख १४ हजार रुपये अदा झाले असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग खेडचे उप अभियंता श्री. बुटाला यांनी दिली. तसेच कामाच्या कार्यादेश प्रसंगी कामाची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, देयके वेळेत न मिळाल्याने केंद्र शासनाने या योजनांना २०२८ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे सांगितले. मात्र तोपर्यंत ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे व भविष्यात या योजना पूर्ण होईपर्यंत त्रास सहन करावा लागणार आहे.

चौकट

उर्वरित कामे शासनाकडून देयके आल्यावर पूर्ण करू-प्रशांत लाड

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ठेकेदारांनी रत्नागिरी जिल्ह्यात नळपाणी योजनेची कामे ६४% हून मार्गी लावली. मात्र, शासनाकडून अपेक्षित देयके न मिळाल्याने ठेकेदारांना पुढील कामे करणे अवघड होऊन बसले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक नळपाणी योजना निधी अभावी रखडल्या आहेत. याचा फटका काडवली येथील नळपाणी योजनेला देखील बसला आहे. या संदर्भात या नळ पाणी योजनेचे ठेकेदार प्रशांत लाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, काडवली येथील नळपाणी योजनेचे सुमारे ६५% काम झाले आहे. उर्वरित कामे शासनाकडून देयके आल्यावर पूर्ण करू, अशी माहिती दिली आहे.