खेड | प्रतिनिधी :
खेड शहरात बुधवारी सायंकाळी आलेल्या पुरामुळे मटन मार्केट परिसरातील एका इमारतीच्या खालच्या मजल्यात पाणी शिरल्याने एक वृद्ध महिला आणि तिची सून अडकून पडल्या होत्या. या संकटाच्या वेळी अल सफा वेल्फेअर फाउंडेशनचे सर्फराज पांगारकर यांनी तब्बल १३ फूट पाण्यात उतरून धाडसी बचावकार्य केले.
यावेळी त्यांच्यासोबत खलील जुईकर यांनीही जीवाची पर्वा न करता जगबुडी नदीच्या पुराच्या पाण्यात बोटीतून जाऊन बचाव मोहिमेत सहभाग घेतला. दोघांनी संयुक्तपणे दोन्ही महिलांची सुखरूप सुटका केली. या संपूर्ण बचाव मोहिमेत अल सफा वेल्फेअर फाउंडेशनच्या टीम सदस्यांनीही मोलाची साथ देत बचावकार्य यशस्वी केले.
अलसफा वेल्फेअर फाउंडेशन ही दरवर्षी पूरपरिस्थितीत मदतीसाठी धावून जाते. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी पोहोचवणे, अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे तसेच गरजूंना विविध प्रकारची मदत करणे असे सामाजिक उपक्रम ते सातत्याने राबवत असतात.
यंदाच्या पुरात सर्फराज पांगारकर, खलील जुईकर आणि अलसफा वेल्फेअर फाउंडेशनच्या टीमने दाखवलेल्या धाडसामुळे दोन महिलांचे प्राण वाचले. त्यांच्या या मोलाच्या कार्याबद्दल खेड शहरासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













