प्रदूषित सांडपाणी प्रकरणी कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आक्रमक

 चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक
 सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर केली कारवाईची मागणी

   चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील पिरलोटे परिसरात रासायनिक सांडपाण्यामुळे सोनगाव नाला प्रदुषित झाल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी खेर्डी औद्योगिक वसाहतीनजीक मासे मरतुकीची घटना घडली होती. या प्रकारामुळे वाशिष्ठी नदी प्रदूषित होत असून याप्रकरणी रासायनिक प्रदूषणाविरोधात कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने शुक्रवारी येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांना निवेदन दिले.
या निवेदनानुसार चिपळूण व खेड तालुक्यातील रासायनिक संकुलांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ, मच्छिमार, शेतकरी आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सीईटीपी) प्रक्रिया न केलेले किंवा बायपासद्वारे सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. नदी, नाले व जलचरांवर विपरीत परिणाम होत असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांडपाणी गुणवत्ता मानकांचे उल्लंघन होत असल्याचे समितीने या निवेदनात म्हटले आहे. तसेच दि. ५ व ६ जुलै रोजी सोनगांव नाल्याला प्रदूषि सांडपाण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी भरत लब्धे, बापू काणे, तुलसीदास पवार, प्रभाकर सैतवडेकर, राजेश पाथरे, कैसर देसाई, पंकज दळवी, आदी उपस्थित होते.