नवयुग उत्कर्ष युवक मंडळातर्फे लांजा तालुकास्तरीय लोकमान्य चषक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

लांजा (प्रतिनिधी): नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) यांच्या वतीने शनिवार, दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वा. नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) येथे लांजा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात येणार असून, प्रत्येक गटासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांवर आधारित विषय निश्चित करण्यात आले आहेत. प्राथमिक व उच्च प्राथमिक गटासाठी (इयत्ता ५ वी ते ८ वी) ‘लोकमान्य टिळक : माझ्या स्वप्नातील आदर्श देशभक्त’, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!’, ‘लोकमान्य टिळकांच्या गोष्टी आणि आपल्यावर होणारे संस्कार’ तसेच ‘गणेशोत्सव आणि शिवजयंती : समाज एकत्र आणणारी दोन माध्यमे’ हे विषय ठेवण्यात आले आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक गटासाठी (इयत्ता ९ वी ते १२ वी) ‘केसरी’ आणि ‘मराठा’ : लोकमान्य टिळकांची पत्रकारिता आणि जनजागृती, ‘चतुःसूत्रीचे प्रणेते : लोकमान्य टिळक’, ‘लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि मंडालेचा कारावास’ तसेच ‘आजच्या तरुणाईचे आयकॉन : लोकमान्य टिळक’ हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.

खुल्या गटासाठी ‘लोकमान्य टिळक : मवाळ ते जहाल – भारतीय असंतोषाचे जनक’, ‘टिळकांची राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’, ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप : टिळकांच्या संकल्पनेपासून आजपर्यंत’ तसेच ‘लोकमान्य टिळकांचे अर्थकारण : स्वदेशी चळवळ आणि आत्मनिर्भर भारत’ हे विषय ठेवण्यात आले आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून, प्राथमिक व उच्च प्राथमिक गटात प्रथम क्रमांकासाठी ₹१००० व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ₹७०० व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी ₹५०० व चषक देण्यात येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांकासाठी ₹१५०० व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ₹१००० व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी ₹७०० व चषक प्रदान करण्यात येणार आहे. खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी ₹२००० व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ₹१५०० व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी ₹१००० व चषक देण्यात येणार असून, प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

प्राथमिक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील स्पर्धकांनी स्पर्धेस उपस्थित राहताना आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांचे पत्र आणणे आवश्यक आहे, तर खुल्या गटातील स्पर्धकांनी आधार कार्ड सोबत आणावे, असे आयोजकांनी कळविले आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे दि. २३ जुलै २०२६ पर्यंत नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नावनोंदणी तसेच अधिक माहितीसाठी मंडळाचे चिटणीस ऋषिकेश बेर्डे (९३७३५०५७७३), गुरुप्रसाद मासये (९१४५०९९०८७), सौरभ कानडे (७७४१०८६६८४) आणि चिन्मय भिंगार्डे (८००७४३४९९८) यांच्याशी संपर्क साधावा. विद्यार्थी, युवक आणि नागरिकांमध्ये प्रभावी वक्तृत्व, राष्ट्रभक्ती, सामाजिक जाणीव आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

लांजा तालुक्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये तसेच इच्छुक नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) यांनी केले आहे.