कोलगावमधून ‘फिरोज बाबा’ला पोलिसांनी घेतले ताब्यात

माजी खासदार विनायक राऊतांच्या सुनेचे अघोरी प्रथांचे आरोप

सावंतवाडी:माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात नाव समोर आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील संशयित ‘फिरोज बाबा’ याला ठाणे पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित फिरोज बाबा याने तिच्यावर कथित जादूटोणा आणि अघोरी विधी केले होते. या गंभीर तक्रारीची दखल घेत ठाणे पोलिसांचे एक पथक तातडीने सावंतवाडीत दाखल झाले आणि त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोलगाव येथून फिरोज बाबाला ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर फिरोज बाबाचे मेहुणे अन्वर ख्वाजा बाऊददीन यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

*दिग्गज राजकारण्यांची होती भोंदूबाबाकडे ये-जा?*

कोलगावच्या या बाबाकडे केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर अनेक दिग्गज राजकीय नेते मंडळींची देखील नियमित ये-जा असायची, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. सर्वसामान्यपणे धर्माच्या नावाने राजकारण करणारे काही नेतेही या भोंदूगिरीला बळी पडल्याचे समोर येत आहे. या प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळातील अनेक बड्या चेहऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

*आणखी चार जणांची नावे समोर; गुन्हे दाखल*

पोलिसांनी या प्रकरणात तपासाचा संशयाचा पिसारा अधिक गतिमान केला असून, या अघोरी कृत्यांमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये मुंबईतील कुर्ला येथील एका मुस्लिम बाबासह, भांडुपचे आबा राऊत, राजापूरचे काझी बाबा आणि कुडाळ नानेली येथील हरिश्चंद्र घाडी यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांनाही पोलिसांकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात जादूटोणा आणि भोंदूगिरीच्या अघोरी प्रकारांवरून तीव्र संताप व्यक्त होत असून, आगामी काळात या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे आणि स्थानिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.