सातुळी तिठा येथे तिघांना अटक : गुरे गोशाळेत जमा
सावंतवाडी : तालुक्यातील सातुळी तिठा येथे अवैध आणि निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. आंबोली दूरक्षेत्र अंमलदार संतोष गलोले, मनीष शिंदे आणि सातुळी ट्राफिक पॉईंट अंमलदार श्री. गोसावी यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत त्यांच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो (क्र. एम एच ०९ इएल ५८२९) हे वाहन जप्त करण्यात आले आहे, तसेच गाडीतून जप्त केलेली गाय आणि एक महिन्याचे वासरू अशा दोन गुरांना गोशाळेत जमा करण्यात आले आहे.
याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तिन्ही संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना सातुळी तिठा परिसरात संशयास्पद हालचालीची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. मालवण येथील कातवण, कुंभारमाठ येथील उमेश सामंत यांच्याकडून खरेदी केलेली एक गाय आणि एक महिन्याचे वासरू घेऊन जात असताना तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
विलास धोंडीराम चव्हाण, वय – ५७,
दिग्विजय सूर्यकांत पाटील, वय – ४३,
नामदेव आनंदा चव्हाण, वय – ३५.
(सर्व रा. चिमणे, ता. आजरा, जि. कोल्हापूर ) अशी त्यांची नावे आहेत. तर
जप्त केलेल्या महिंद्रा बोलेरो या वाहनातून संशयित आरोपी हे दोन गुरांची निर्दयतेने आणि कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल आणि विनापरवाना वाहतूक केल्याबद्दल या तिन्ही आरोपींवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. जप्त केलेली गुरे सुरक्षितपणे गोशाळेत ठेवण्यात
आली आहेत.













