कणकवलीत बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न.!

कणकवलीत बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न.!

बँक सुरक्षा व पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला

कणकवली : कणकवली शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमवर अज्ञात चोरट्याने फोडाफोड करून पैसे लंपास करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र बँकेच्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेची तत्परता आणि कणकवली पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादामुळे चोरट्याचा हा डाव अयशस्वी ठरला.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. या एटीएमची सुरक्षा यंत्रणा नोएडा येथील नियंत्रण केंद्राशी जोडलेली असल्याने संशयास्पद हालचाल होताच तेथील नियंत्रण कक्षाला तातडीचा इशारा प्राप्त झाला.

यानंतर नोएडा येथील सुरक्षा यंत्रणेकडून त्वरित कणकवली पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच ड्युटीवर असलेल्या कणकवली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिस पोहोचण्यापूर्वीच संबंधित चोरटा घटनास्थळावरून पसार झाला होता.

या घटनेमुळे शहरात काही काळ खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. फरार संशयिताचा सीसीटीव्हीतील फोटो देखील समोर आला असून पोलीस अज्ञात संशयिताचा शोध घेत आहे.