गुहागर प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील विविध गावांतील वीज ग्राहक, ग्रामस्थ आणि प्रतिष्ठित नागरिकांनी शृंगारतळी येथील महावितरण कार्यालयात जाऊन महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेत स्मार्ट मीटर बसविण्याची पद्धत, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच त्यामुळे ग्राहकांना होत असलेले आर्थिक नुकसान, वित्तहानी आणि संभाव्य जीवितहानीच्या धोक्याबाबत जाब विचारला.
यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्मार्ट मीटरसह संबंधित धोरणे शासनाकडून राबविली जात असून त्यामध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांकडे नाही. ग्राहकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी तांत्रिक पातळीवर सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावर उपस्थित वीज ग्राहकांनी वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याची नाराजी व्यक्त केली. तसेच घरात कोणीही नसताना ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची पद्धत अन्यायकारक असल्याचे सांगत याबाबत तीव्र आक्षेप नोंदविला. यावरही महावितरण अधिकाऱ्यांनी ही बाब शासनाच्या धोरणाशी संबंधित असल्याचे सांगत त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले.
याप्रसंगी गुहागर तालुक्यातील वीज ग्राहकांतर्फे, पाठपन्हाळे ग्रामपंचायतीतर्फे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्यातर्फे महावितरणाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, उपतालुकाध्यक्ष प्रसाद विखारे, उपतालुकाध्यक्ष स्वप्निल जाधव, सांस्कृतिक विभागाचे राहुल जाधव, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष प्रथमेश रायकर, उपविभाग अध्यक्ष विश्वजीत पोद्दार, महेश शिगवण महाराष्ट्र सैनिक विवेक जानवळकर तसेच विविध गावांतील ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते.










