राजापुरातील ऑनलाईन फसवणूक प्रकरणी राजापूर पोलीसांकडून जलद गतीने तपास तीन लाखाची रक्कम परत मिळवून दिली

राजापूर प्रतिनिधी : राजापूरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक एड. जमिर खलिफे यांच्या मोबाईलच्या व्हॉटसअपवरवर फेक लिंक पाठवून झालेल्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणी राजापूर पोलीसांना तपास लावण्यात यश आले आहे. या सायबर गुन्हयात राजापूर पोलीसांनी एड. खलिफे यांची गेलेली तीन लाख रूपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी पुणे व परिसरातील पाच संशयीत आरोपीं विरोधात कारवाई करत त्यांच्याकडून हे पैसे वसुल केले आहेत. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे. राजापूर पोलीसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
दिनांक १६/०४/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा.चे दरम्याने यातील फिर्यादी एड.खलिफे यांचे वडील निजामउद्दीन खलिफे हे घरी असताना त्यांचा मोबाईल क्रमांक ९४२२०५२५६५ या व्हाटसअप मोबाईलवर अज्ञात इसमाकडून RTO E- Challan.apk फाईल मेसेज त्यांना पाठवीण्यात आला होता. या मेसेजमध्ये व्हेईकल रजिस्ट्रर नंबर LA011009 व चलन नंबर LA21071734311687 असे नमुद करण्यात आले होते. एड. खलिफे यांचे वडीलांनी RTO E- Challan. apk फाईल मेसेज त्यांच्या मोबाईल क्रमांक ९०२८४०७८६५ यावर पाठविला. फिर्यादी यांनी ती फाईल ओपन केली. त्यानंतर एड. खलिफे यांना आधार ओटीपीचा मेसेज आला. त्यानंतर थोड्या वेळाने एड. खलिफे यांचे Indusind Bank शाखा राजापूर सेव्हींग खाते क्रमांक १५९०२८४०७८६५ या खात्यातून एकूण ३,००,०००/- रुपये अज्ञात इसमाने ऑनलाईनद्वारे डेबीट केल्याचा मेसेज एड. खलिफे यांना आला. त्यानंतर एड. खलिफे यांचे लक्षात आले की, RTO E-Challan.apk फाईल ओपन केल्यामुळे ऑनलाईन फ्रॉड होवून आपली आर्थिक फसवणुक झालेली आहे. या प्रकरणी तात्काळ एड. जमिर खलिफे यांनी राजापूर पोलीसांत तक्रार दिली. तर ऑनलाईन फसवणूक झालेली असल्याने एड. खलिफे यांन १९३० या नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदविली.
या प्रकरणी राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी तपास सुरू केला असता पुणे येथील फिनकॉर्प कंपनी मार्फत काहींनी कर्ज घेतले होते व त्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख यांना पुणे येथे तपासासाठी पाठविण्यात आले. त्यावेळी १) मितेश जालींदर वाघुले वय ३४ वर्षे रा. पांडूरंगवाडी महाळुंगे तर्फे निमगाव जुन्नर जि. पुणे २) किरण मच्छिंद्र नेहरकर वय २४ वर्षे रा. येडगाव जुन्नर जि.पुणे ३) विजय काशीनाथ वो-हाडे वय ४५ वर्षे रा.मु.केळी पो. चावंड ता. जुन्नर जि. पुणे ४) दत्तात्रय गंगाराम गवारी वय ४४ वर्षे रा. मु.सुकाळवेढे पो. आंबे ता. जुन्नर जि.पुणे ५) गंधार संजय रत्नपारखी वय ३३ वर्षे रा. वाजारपेठ लक्ष्मीनारायण मंदीराच्या जवळ नारायणगांव जि.पुणे असे पाच संशीयत या प्रकरणात असल्याचे आढळून आले. तर यातील मुख्य संशयीत आपोली शादाब अन्सारी वय ४१ वर्षे रा. सन ऑफ रियासत अली नियर क्लासिक वेकरी हुंडाई चौक खालुवे चाकण तळेगाव रोड खालुवे जि. पुणे हा असून तो सध्या फरारी आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात आणखी सखोल तपास पोलीस करत असून यांच्याकडून अन्य ठिकाणी अशा प्रकारे फ्रॉड झाला आहे काय याचीही तपासणी केली जात आहे.
अशा प्रकारे लोन भरण्यासाठी कमिशन पध्दतीने व्यवहार केले जातात व अशा प्रकारच्या फेक लिंक पाठवून अन्य व्यक्तींची फसवणूक केली जाते हे या तपासात पुढे आले आहे.
या प्रकरणी या पाचही संशयीत आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली. यातील एड. खलिफे यांच्या मोबाईलवर ती लिंक पाठवून ऑनलाईन फसवणूक करून काढलेले तीन लाख रूपये हे मितेश जालींदर वाघुले व किरण मच्छिंद्र नेहरकर यांच्या पुणे येथील फिनकॉर्प कंपनी मार्फत घेतलेल्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली होती. पोलीसांनी ही रक्कम तात्काळ एड. खलिफे यांच्या खात्यात वर्ग केली आहे.
या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक नितिन बगाटे, अपर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी, उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक मोबीन शेख, पोलीस कर्मचारी दिनेश आखाडे, दिगंबर शेलार, दीपक काळे यांनी तपास कामी परिश्रम घेत या गुन्हयाचा तपास लावला आहे. राजापूर पोलीसांच्या या कामगीरीचे कौतुक होत आहे.
ऑनलाईन फसवणूकीबाबत जागरूक रहा –अमित यादव
सध्या मोठया प्रमाणावर ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. तरी नागरिकांनी याबाबत सतर्क रहाणे आवश्यक आहे. कोणत्याही माहित नसलेल्या नंबरवरून आलेले कॉल टाळावेत, तसेच मेसेच वा कोणतीही लिंक ओपन करू नये, फेक कॉल व फेक मेसेजवर विश्वास ठेऊ नये, आपली बँक डिटेल्स, ओटीपी कोणालाही शेअर करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले आहे. तरीही जर का अशा प्रकारे ऑनलाईन फसवणूक झालीच तर १९३० या क्रमांवर तात्काळ संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे आवाहनही यादव यांनी केले आहे.