उधळे येथे रेल्वेच्या धडकेत ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील उधळे परिसरातील रेल्वे ट्रॅकवर झालेल्या भीषण अपघातात ५६ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
मयताचे नाव पांडुरंग सिताराम भूवड (वय ५६, रा. वावे तर्फे नातू, भुवडवाडी, ता. खेड) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१२ जुलै) सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास उधळे येथील रेल्वे ट्रॅकवर ही दुर्घटना घडली. मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या हिस्सार एक्सप्रेस रेल्वेची पांडुरंग भूवड यांना जोरदार धडक बसली.
या भीषण धडकेत त्यांचा डावा हात आणि डावा पाय तुटला, तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा अधिक तपास आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वावे तर्फे नातू परिसरात शोककळा पसरली आहे.