किरकोळ नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही
दापोली (प्रतिनिधी) – दापोली तालुक्यातील बांधतिवरे बसस्टॉपजवळ २८ जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास एक अपघात घडला. एसटी बस आणि पिकअप वाहन यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, दापोली एसटी आगारातून निघालेली बस बांधतिवरे मार्गे आतगावकडे जात होती. दरम्यान, बस स्थानकापासून काही अंतरावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप गाडीने वळणावर नियंत्रण गमावल्याने बसला समोरासमोर धडक दिली. रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनांना बाजूला होण्यासाठी पुरेशी जागा नसल्यानं हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
धडकेमुळे दोन्ही वाहनांचे समोरील भाग थोडेफार वाकले असून चालक आणि प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.












