वाकी येथील अनेक वर्षांची विजेची समस्या मार्गी;

ग्रामस्थांकडून महावितरणचे आभार

गुहागर (प्रतिनिधी): वाकी गावातील गेल्या अनेक वर्षांपासूनची विजेची समस्या अखेर मार्गी लागली असून, गुहागर मार्गे नवीन विद्युत वाहिनीची जोडणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)चे आभार व्यक्त केले आहेत.

 

सुमारे ४० वर्षांपूर्वी वाकी गावाला वीजपुरवठा करण्यात आला होता. त्यावेळी पालपेणे मार्गे सुमारे तीन किलोमीटर लांबीची विद्युत वाहिनी डोंगर, जंगल आणि दाट झाडीतून टाकण्यात आली होती. कालांतराने या वाहिनीचे अनेक वीजखांब जीर्ण झाले होते. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या व झाडे वारंवार तारांवर पडत असल्याने वीजपुरवठा खंडित होत असे.

 

दाट जंगल, कठीण भौगोलिक परिस्थिती आणि जंगली प्राण्यांचा धोका यामुळे वायरमन व लाईनमन यांना दुरुस्तीचे काम करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास विलंब होत असे. मागील वर्षी तर सलग पाच दिवस गावातील वीजपुरवठा बंद होता. त्यावेळी ग्रामस्थांनी स्वतः जंगलातून वाट काढून तुटलेले वीजखांब उभारण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले होते.

 

ही समस्या कायमची सोडविण्यासाठी गुहागर मार्गे नवीन विद्युत जोडणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी सातत्याने लावून धरली होती. त्यानुसार महावितरणने नवीन विद्युत वाहिनी उभारून नुकतीच गुहागर मार्गे वाकी गावाला जोडणी दिली आहे. त्यामुळे आता झाडे पडणे किंवा वीजखांब कोसळल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

 

या कामासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुनील सूद, शृंगारतळी शाखेचे अभियंता बी. के. सोनावणे, गुहागर शाखेचे अभियंता ऋषिकेश शेटे, लाईनमन मोहन लोंढे, वायरमन अंगराज साळुंखे आणि साईश घुमे यांनी विशेष मेहनत घेतली.

 

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने वाकी ग्रामस्थ तसेच मुंबईस्थित ग्रामस्थांनी महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.