गॅस सिलिंडरवरील कोडमध्ये दडलेली असते तपासणीची माहिती
सिलिंडर वापरण्यापूर्वी हा कोड तपासणे प्रत्येक ग्राहकासाठी आवश्यक
घरगुती LPG गॅस सिलिंडरवर छापलेले A, B, C, D आणि त्यासोबतचे आकडे अनेकदा ग्राहकांच्या नजरेतून सुटतात. मात्र, हे कोड सिलिंडरच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असतात. या कोडच्या माध्यमातून सिलिंडरची पुढील अनिवार्य तपासणी कधी होणार आहे, याची माहिती दिलेली असते. त्यामुळे गॅस सिलिंडर स्वीकारण्यापूर्वी हा कोड तपासणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ही छोटी सवय मोठा अपघात टाळण्यास मदत करू शकते.
मुंबई : घराघरांत वापरल्या जाणाऱ्या LPG गॅस सिलिंडरच्या वरच्या धातूच्या पट्टीवर A, B, C, D अशी अक्षरे आणि त्यासोबत काही आकडे लिहिलेले असतात. अनेक ग्राहक या कोडकडे दुर्लक्ष करतात. मात्र, हा कोड सिलिंडरच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती देत असतो.
गॅस कंपन्या प्रत्येक सिलिंडरची ठराविक कालावधीनंतर सुरक्षा तपासणी करतात. पुढील तपासणी कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षी होणार आहे, याची माहिती या कोडमध्ये दिलेली असते.
कोडमधील अक्षरांचा अर्थ :
A – जानेवारी ते मार्च
B – एप्रिल ते जून
C – जुलै ते सप्टेंबर
D – ऑक्टोबर ते डिसेंबर
उदाहरणार्थ, सिलिंडरवर B-27 असे लिहिले असल्यास त्याचा अर्थ एप्रिल ते जून 2027 या कालावधीत त्या सिलिंडरची पुढील सुरक्षा तपासणी होणे आवश्यक आहे.
ग्राहकांनी मुदत संपलेला किंवा तपासणीची तारीख उलटलेला सिलिंडर स्वीकारू नये. अशा वेळी त्वरित गॅस वितरकाला माहिती देऊन दुसरा सिलिंडर मागवावा. यामुळे संभाव्य अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होते.
तज्ज्ञांच्या मते, गॅस सिलिंडर वापरताना रेग्युलेटर, गॅस पाईप आणि गळतीची तपासणी नियमित करणेही तितकेच आवश्यक आहे. सुरक्षित वापरासाठी प्रत्येक ग्राहकाने सिलिंडरवरील कोड तपासण्याची सवय लावावी.
स्रोत : प्रहार डिजिटल











