संशयित फिरोज बाबाच्या घराची ठाणे पोलिसांकडून झाडाझडती : दोन पथके सावंतवाडीत दाखल

कोलगावमधून आणखी एक जण चौकशीसाठी ताब्यात

​सावंतवाडी:
माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणाचा तपास आता कमालीचा वेगवान झाला आहे. या गुन्ह्यात मुख्य संशयित असलेला सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज बाबा याच्या घराची आज, मंगळवारी ठाणे पोलिसांच्या दोन पथकांनी कसून झाडाझडती घेतली. तसेच त्याच्या संपर्कात असलेल्या कोलगावमधीलच अन्य एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे.

​ ​माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने दाखल केलेल्या फिर्यादीत फिरोज बाबा याच्यावर तिच्यावर कथित जादूटोणा आणि अघोरी विधी केल्याचा थेट आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे ठाणे पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोलगाव येथून फिरोज बाबाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

​घराची झाडाझडती आणि चौकशीचे सत्र
​मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, पोलीस कोठडीत असलेल्या फिरोज बाबाच्या चौकशीतून मिळालेल्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे आज ठाणे पोलिसांची दोन पथके पुन्हा एकदा कोलगाव येथे धडकली. त्यांनी फिरोज बाबाच्या घराची सखोल झाडाझडती घेतली, तसेच त्याच्याशी संबंधित इतरही काही संशयास्पद जागांचा तपास केला. काही जागांची व ठिकाणांची त्यांनी छायाचित्रेही घेतली.

तसेच काही वस्तू ताब्यात घेतल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे.
यादरम्यान, फिरोज बाबाच्या संपर्कात असलेल्या एका स्थानिक व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी सोबत नेल्याने कोलगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीला नेमके कशासाठी नेण्यात आले, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

​तपासाची व्याप्ती वाढणार?
​माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्याच तपासाचा एक भाग म्हणून ही धडक कारवाई करण्यात आली आहे. या अघोरी आणि जादूटोणा प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, तसेच फिरोज बाबाला या कृत्यात कोणी मदत केली होती का, याचा शोध आता ठाणे पोलीस घेत आहेत. पुढील तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.