कार्यकर्त्यांनी आपली मने विशाल करणे गरजेचे – आमदार प्रमोद जठार

कुडाळमध्ये विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांचा जंगी सत्कार

भाजपच्या वाटचालीत कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित

कुडाळ :
“भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ती राष्ट्राची पूजा आहे. आज १९ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, त्यामागे शंभर वर्षांचे कष्ट आहेत. कार्यकर्त्यांनी आता जुना-नवा असा वाद बाजूला ठेवून आपली मने विशाल करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार *प्रमोद जठार यांनी येथे केले.

कुडाळ येथे आमदार प्रमोद जठार यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, दादा बेळणेकर, रणजित देसाई, राजू राऊळ, लारेन्स मन्येकर, सिताराम तेली, भाई सावंत, किरण शिंदे, संजय वेंगुर्लेकर, संध्या तेरसे, नीरजा जठार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षविस्तारात जठार यांचे मोठे योगदान – प्रभाकर सावंत

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जठार यांच्या कार्याचा गौरव केला. “२००७ पासून मी जठार यांचे कार्य जवळून पाहिले आहे. जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आमदारकी किंवा खासदारकीचे तिकीट हुकले तरी ते कधीही खचले नाहीत किंवा आग्रही राहिले नाहीत. आज त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळणे हा कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा विजय आहे,” असे सावंत म्हणाले.
रणजित देसाई यांनी आपल्या भाषणात मिश्किल टिप्पणी केली. “प्रमोद जठार यांच्या गाडीवरचा ‘आमदार’ नावाचा स्टिकर कधीच निघाला नव्हता, फक्त आता त्याचा रंग बदलला आहे,” असे ते म्हणाले. तसेच खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास अधिक गतीने करूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२०४७ पर्यंत देश अखंड होईल – आमदार जठार

सत्काराला उत्तर देताना प्रमोद जठार यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले. ते म्हणाले, “रवींद्र चव्हाण, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, नितेश राणे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. येणाऱ्या संकटांवर मात करून आपल्याला काम करायचे आहे. २०४७ पर्यंत हा देश अखंड झाल्याशिवाय राहणार नाही. आपले सर्व नेते तसेच पालकमंत्री नितेश राणे विशेष प्रयत्न करतच आहेत, मात्र आपण सर्वांनी आपल्या भागाचा विकास कसा होईल त्याकडे लक्ष देऊन आपण सर्वांनी काम केले पाहिजे.” पक्षाची विचारधारा प्रवाहित ठेवण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे. जुना नवीन वाद समाप्त करा. जी मंडळी नव्याने पक्षात येतील त्यांचे स्वागत करा त्यांना सांभाळून घ्या. असे सल्ले यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय वेंगुर्लेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सिताराम तेली यांनी केले. या सोहळ्यामुळे कुडाळ तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.