शिवसेना महिला सेनेचे कुडाळात निदर्शने; घोषणाबाजी करत निषेध
स्वप्निल कदम | कुडाळ :
माजी खासदार विनायक राऊत, त्यांच्या कुटुंबीयांसह संबंधित भोंदू बाबांविरोधात तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना महिला सेनेच्या वतीने कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर शिवसेना महायुती कार्यालयासमोर महिला पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.
शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख सौ. दिपलक्ष्मी पडते यांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे कुटुंबीय तसेच संबंधित भोंदू बाबांविरोधात त्यांची सून श्रीमती गिरीजा गीतेश राऊत यांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींमध्ये मानसिक व शारीरिक छळासह महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचविणाऱ्या गंभीर बाबींचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
स्त्री सन्मान, सुरक्षितता आणि न्याय या मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच संबंधित भोंदू बाबांकडून अंधश्रद्धा पसरवून महिलांचा गैरफायदा घेतला जात असल्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्याविरोधातही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन सादर केल्यानंतर शिवसेना महायुती कार्यालयासमोर महिला पदाधिकाऱ्यांनी विनायक राऊत व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. पीडितेला न्याय मिळावा आणि या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.
यावेळी महिला सेना जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांच्यासह संग्राम साळस्कर, देवेंद्र नाईक, नगरसेवक अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, राकेश नेमळेकर, श्रुती वर्दम, रश्मी नाईक, वर्षा संभाजी, यज्ञ साळगावकर, रेवती राणे, प्रज्ञा राणे, चेतन पडते, मंदार पडवळ, सागर वालावलकर, सुनीता धुरी, मधुरा धुरी, रंजना बांबुळकर, मधुरा तुळसकर, जानवी कदम तसेच शिवसेना महिला सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.











